शहरातील सटाणा नाका परिसरातील गोदामास मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे तीन कोटींच्या कापडाच्या गाठी भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. तब्बल सात तासांनंतर आग आटोक्यात आली. शहरातील अग्निशामक दलाच्या आपत्ती व्यवस्थापनातील मर्यादा या निमित्ताने पुन्हा एकवार स्पष्ट झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोयगाव किराणा बाजारपेठेनजीक कापडाची तीन-चार गोदामे आहेत. यंत्रमागावर तयार झालेले कापड खरेदी केल्यावर व्यापारी वाहनांद्वारे बाहेरगावी माल पाठवत असतात. कापडाच्या गाठींची वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत या गोदामांमध्ये मालाची साठवणूक केली जाते. त्यातील अशोक गुप्ता यांच्या मालकीच्या लोखंडी पत्र्यांच्या गोदामात विविध व्यापाऱ्यांच्या एक हजारावर कापडाच्या गाठींची साठवणूक करण्यात आलेली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास गोदामातून धूर निघत असल्याचे शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर अग्निशामक दलाला कळविण्यात आले. परंतु तब्बल तासानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली.
पालिकेच्या दोन बंबांच्या साहाय्याने ही आग विझवण्याचे काम सुरू झाले. परंतु हे प्रयत्न अपुरे पडले. लोखंडी पत्र्याच्या या गोदामात पाण्याचा फवारा मारण्यात अडचणी येत असल्याने हे पत्रे तोडण्यासाठी जेसीबी यंत्रणा पाठविण्याची विनवणी पालिकेकडे करण्यात आली. परंतु चालक उपलब्ध नसल्याने पालिकेची यंत्रणा घटनास्थळी येऊ शकली नाही. अखेर जमलेल्या लोकांना खासगी जेसीबी यंत्रणेची व्यवस्था करावी लागली. या शिवाय पालिकेच्या दोघा बंबांमुळे आग आटोक्यात येणे शक्य नसल्याची खात्री झाल्यावर मनमाड, सटाणा व धुळे येथील आग्निशमन दलास पाचारण करावे लागले. सकाळी पाच वाजेपासून दुपारी बारापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. गोदामाचे मालक बाहेरगावी असल्याने कापडाच्या किती गाठी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, याचा निश्चित आकडा समजू शकला नाही. तरी किमान हजार गाठी भस्मसात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एकेका गाठीची किंमत २५ ते ३० हजार रुपये असल्याने सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पालिकेच्या या ढेपाळलेल्या कारभाराबद्दल शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून प्रसिद्ध व्यापारी महेश पाटोदिया यांनी यासंबंधी आयुक्त अजित जाधव यांना सविस्तर निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली. आगीसारख्या घटनांमध्ये भविष्यात अशी बेपर्वाई होऊ नये म्हणून पालिकेने उपाययोजना आखाव्यात अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे.