लोक मला विचारतात, तुम्ही देवाला घाबरता का?, पण ‘मी देवाला नव्हे तर त्याच्या दलालांना घाबरतो’, असे रोखठोक विधान ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांनी रविवारी मुंबई विद्यापीठात केले. समाजात अनेक नास्तिक असून त्यांनी मनात कुठलीही खंत न बाळगता पुढे येऊन छातीठोकपणे ‘मी नास्तिक आहे’, हे ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
वयाच्या २३व्या वर्षी ‘मी नास्तिक का आहे?’, हे पुस्तक लिहिणाऱ्या हुतात्मा भगतसिंगांच्या ८३ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच नास्तिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतूनच नव्हे तर आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक राज्यात कार्यरत अनेक कार्यकत्रे आणि नास्तिक अशी जवळपास ४०० मंडळी या वेळी उपस्थित होती.
२३ मार्च हा दिवस यापुढे ‘नास्तिक दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशीही मागणी सर्व वक्त्यांतर्फे या निमित्ताने करण्यात आली.   नास्तिक माणूस तत्त्वांना धरून चालतो आणि संघर्ष करूनच नास्तिक म्हणून समाजात वावरत असतो. देवाचा आधार घेतला तर माणूस कमकुवत होतो. त्यामुळेच मी नास्तिक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केले. देशात नास्तिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. अशा वेळी वातावरणातील कोंडी फोडून अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल रेड्डी यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.
पुढारलेल्या महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या होणे आणि सात महिने उलटून गेले तरी मारेकऱ्यांचा छडा न लागणे ही खेदाची बाब आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष, लेखक ज. वि. पवार म्हणाले. जिथे आपण धर्म मानतो, तिथे आपण आपला विवेकवाद गहाण ठेवतो. परंतु देशाची प्रगती केवळ विवेकवादानेच होईल, असेही पवार म्हणाले.   
नास्तिक असण्यात काहीच गर नाही, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशा समविचारी लोकांना एकत्रित आणण्यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, असे आयोजक संजय सावरकर ‘वृत्तान्त’शी बोलताना म्हणाले. आम्हाला नास्तिक असण्याचा अभिमान आहे आणि आम्ही कुठल्याही भोंगळवादाला बळी न पडता, या विचारावर ठाम राहू, अशी प्रतिज्ञाही या वेळी घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First atheist mela in mumbai
First published on: 25-03-2014 at 06:54 IST