मासळीला योग्य भाव न मिळणे आणि वजनात येणारी घट या विरोधात १७ नोव्हेंबरपासून उरणमधील करंजा, मोरा तसेच अलिबागमधील अनेक बंदरांतील शेकडो मच्छीमार बोटींनी मच्छीमारी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दररोजच्या बाजारात येणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. याचा परिणाम मासळीच्या दरावर झाला असून मासळीचे दर दुपटीने वाढलेले आहेत. याचा परिणाम केवळ ओल्या मासळीच्या दरावर नाही तर सुक्या मासळीच्या दरावरही झाल्याने खवय्यांना अधिकचे पैसे भरून मासळी खरेदी करावी लागत आहे.
उरणच्या करंजा बंदरात पर्सनेटचे ३५० तर ४०० पेक्षा अधिक ट्रॉलर्स असून तीनशे पर्यंत मोरा बंदरातील मच्छीमार बोटींची संख्या आहे. या सर्व मच्छीमार बोटी मासेमारी केल्यानंतर आपली मासळी मुंबईतील ससून डॉकच्या मासळी बाजारात विक्री करतात. या बाजारात कोकणातील मच्छीमारांना इतर बाजाराच्या तुलनेने कमी दर दिला जात असून मासळीचे वजन करण्यात येणारे काटे हे जादा मासळी घेऊन कमी वजन दाखवीत असल्याने इलेक्ट्रॉनिक काटे वापरावेत, अशी मागणी मच्छीमार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने मच्छीमारांना मासेमारी बंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. परिणामी सध्या गुजरातमधील मच्छीमारांकडून येणारी तसेच स्थानिक मच्छीमारांनी केलेल्या मासेमारीवर अवलंबून राहावे लागत आहे. मासेमारी बंद करण्यात आल्याने मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मासळीच्या दरात दुपटीने वाढ झालेली असून खोल समुद्रातील मोठी मासळी मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा परिणाम ओल्या मासळीबरोबरच सुक्या मासळीच्या दरातही वाढ होण्यात झाला असल्याचे मत करंजा येथील मच्छीमार नेते सीताराम नाखवा यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish prices rise in navi mumbai
First published on: 28-11-2014 at 12:35 IST