भोसरीत बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या दर्शनी भागाचा स्लॅब कोसळल्याने पाच कामगार जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर इमारतीचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
परशूराम पन्नापा व्यंकटगे (वय-२०), सिध्दप्पा सज्जाप्पा बनगे (वय-३८), शिवानंद विठ्ठल पाटील (वय-४४), जीवन अमृत मसुरे (वय-२७), मनोज शिवाजी कोरे (वय-१९, सर्व राहणार, चक्रपानी वसाहत, भोसरी) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी मसुरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. भोसरी-आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौकात ‘राजवीर हाईट्स’ या इमारतीचे काम सुरू आहे. सोमवारी दुपारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरू होते, तेव्हा इमारतीचा स्लॅब कोसळला व हे कामगार खाली पडले. जखमी कामगारांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. पोलीस तसेच अग्निशामक दलाचे पथक तेथे पोहोचले. नगरसेवक विश्वनाथ लांडे, अजित गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त विष्णू माने, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात आदी घटनास्थळी होते. अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी होते. हळूहळू परिस्थिती आटोक्यात आली.
अरुण गव्हाणे यांच्या मालकीची ही इमारत असून कल्लप्पा गुंडाजी घोडके हे बांधकाम ठेकेदार आहेत. या दोघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार गजेंद्र साखरे करत आहेत.