येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षांपासून ५ विषयांत पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमास मान्यता दिली. प्रोस्थोडोन्टीक्स अ‍ॅन्ड क्राऊन ब्रिज, कन्झरवेटिव्ह टेन्टीस्ट्री अ‍ॅन्ड एन्डोडोन्टीक्स, ऑर्थोपेडिक्स अ‍ॅन्ड डेन्टोफेशियल ऑर्थोपेडिक्स, पॅरिओडॉन्टोलॉजी, ओरल पॅथालॉजी अ‍ॅन्ड मायक्रोबायोलॉजी या ५ विषयांत पदवीसाठी देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.
मराठवाडय़ात परभणीचे सरस्वती दंत महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची विद्यार्थी क्षमता व गुणवत्ता पाहता सर्वात मोठे दंत महाविद्यालय ठरले आहे. दंत महाविद्यालय सुरू होऊन पहिल्या पदवीधारक विद्यार्थ्यांची बॅच बाहेर पडल्याबरोबर लगेच पदव्युत्तर शिक्षणाची परवानगी गुणात्मकदृष्टय़ा व शैक्षणिकदृष्टय़ा दर्जेदार असलेल्या महाविद्यालयांनाच देशपातळीवर देण्यात येते. शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता तपासणी विविध राज्य व केंद्र शासकीय पातळीवर मानांकित झाल्याने परभणीच्या दंत महाविद्यालयास पदव्युत्तर शिक्षणाचा गुणात्मक बहुमान मिळाला. मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, सचिव डॉ. विद्या पाटील यांनी केले आहे. दंत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उर्वरित ४ विषयांत शिक्षणाची सोय पुढील शैक्षणिक वर्षांत केंद्र सरकारच्या परवानगीने केली जाईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
येत्या वर्षांत दंत महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय सुरू होत आहे. यात कॅथ, लॅब, कार्डियाक सर्जरी, डायलेसिस, स्पाईन सर्जरी, कॅन्सर उपचार या टर्शरी केअर सुविधा उपलब्ध असतील. मराठवाडय़ातील हे सर्वात मोठे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असेल. याचा लाभ परभणीसह संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील नागरिकांना घेता येईल. भविष्यात परभणीच्या दंत महाविद्यालयाचा अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठाशी सामंजस्य शैक्षणिक करार चालू असून परभणीचे दंत महाविद्यालय नजिकच्या काळात अमेरिकन व भारतीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यास प्रयत्नशील आहे.