अ‍ॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया तर्फे रेसकोर्स जवळील एम्प्रेस गार्डन येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले आहे.
या प्रदर्शनात शेतीसाठी तसेच बागकामासाठी आवश्यक औजारे, बी-बियाणे, औषधे इ. ची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे स्टॉल्स असणार असून नवोदित चित्रकार, शिल्पकार यांना आपली कला लोकांसमोर सादर करता यावी या उद्देशाने एक स्वतंत्र कला विभागाचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. या पुष्प प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यात फुलांबरोबरच निरनिराळी शोभिवंत झाडे, भाजीपाला, पुष्परचना आदि रसिकांना बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात दोन किंवा तीन वृक्ष एकमेकांना जोडून किंवा एकाच वृक्षांच्या फांद्या एकमेकींना कलम पद्धतीने जोडून तयार केलेली बोन्साय पाहायची संधीही उपलब्ध होणार आहे.