विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवास आणि भोजन व्यवस्था आमदार निवासमध्ये करण्यात आली आहे. आमदारांचा भोजन कक्ष वातानुकूलित करण्यात आला असून सामान्य कार्यकर्त्यांसाठी मात्र भोजनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार निवासमधील भोजन कक्षाबाहेर एकावेळी पाचशे ते सहाशे लोक भोजन करू शकतील असा शामियाना उभारण्यात आला असून त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि इतरही लोक भोजनाचा आस्वाद घेत आहेत. दरम्यान, यासाठी जवळपास दररोज ७५ किलो मटण, ४ हजार अंडी, ८० किलो मासे लागत आहेत.
 आमदारांसाठी तीन वेगवेगळे वातानुकूलित भोजन कक्ष तयार करण्यात येत आहेत. या भोजन कक्षाची जबाबदारी गेल्या चार पाच वर्षांपासून तपन डे यांच्याकडे असून त्यांच्याकडे सध्या विविध विभागात दीडशे ते दोनशे कर्मचारी काम करीत आहेत. भोजन व्यवस्थेबाबत बोलताना तपन डे म्हणाले, आमदारांना चांगले भोजन मिळावे यासाठी सर्व चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इमारत क्रमांक एकमध्ये १३२ खोल्या , दोनमध्ये १८३ व तीनमध्ये ३२ खोल्या आहेत. बहुतेक सर्व खोल्याचे वाटप करण्यात आले असून ९ डिसेंबरपासून आमदार आणि त्यांचे सचिव किंवा कार्यकर्ते येणार असल्यामुळे भोजन कक्ष सुरू करावा लागणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी स्पयंपाक गृहातील व्यवस्था त्याच पद्धतीची असून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे तयार करण्यात येतात. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी कोलकाता वरून खास आचारी बोलविण्यात आले आहेत. या शिवाय शाकाहारी पदार्थ तयार करण्यासाठी राजस्थानी मारवाडी आचारी या ठिकाणी आहेत. जवळपास दररोज ७५ किलो मटण, ४ हजार अंडी, ८० किलो मासे लागत आहेत. याशिवाय सावजी स्पेशल चिकन, मटण आणि बिर्याणी हे मांसाहारी पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. शाकाहारी पदार्थामध्ये रोज झुणका, भाकर, ठेचा हे वऱ्हाडी स्पेशल जेवण आहे. या शिवाय रोज दोन भाज्या, दाल फ्राय, चटणी, पोळी, भात आणि एखादा गोड पदार्थ असा रोजचा मेन्यू आहे. रोज चार हजार लोक भोजनाचा आस्वाद घेत आहेत.सर्व पदार्थ तयार करण्यासाठी रोज कि मान २० सिलेंडर लागत आहेत. सकाळी चहा, नास्ता, दुपारी १२ वाजता जेवण, त्यानंतर दुपारी पुन्हा नास्ता आणि रात्री जेवण असा रोजचा दिनक्रम असल्याचे डे यांनी सांगितले.