अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटना दुरुस्तीला महामंडळाच्या सदस्य संख्येच्या २/३ सदस्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र विश्व मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनाध्यक्ष निवडणुकीसाठीची वाढीव मतदार संख्या या दोन्ही विषयांच्या ठराव मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झालेली नसतानाही महामंडळाने आपल्या इतिवृत्तात मात्र ‘महामंडळाच्या ३१ मार्च २०१२ व २० मे २०१२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये महामंडळाच्या सुधारित घटनेचा मसुदा मान्य करण्यात आला आहे,’ असे नमूद केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
घटना दुरुस्तीच्या मसुद्याला बडोदा येथे ३१ मार्च २०१२ रोजी झालेल्या महामंडळाच्या सभेतच मान्यता देण्यात आली. या बैठकीत दोन मुद्दय़ांबाबत स्पष्टीकरणाचा भाग वगळून घटना दुरुस्ती मान्य करण्यात आली होती. इतिवृत्तात नोंद करताना इतिवृत्त लेखन भाषेच्या विशिष्ट शैलीत न लिहिले गेल्याने घटना दुरुस्तीला मान्यता देण्यात आली पण ठराव झाला नाही, असा अर्थ काढण्यात आला. ती इतिवृत्तातील उणीव होती. २० मे २०१२ रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत दोन मुद्दय़ांबाबत कायदेतज्ज्ञांकडून मिळालेल्या मतांविषयी सभेला अवगत करण्यात आले. त्यामुळे स्पष्टीकरणासंदर्भात राहिलेला भाग पूर्ण झाल्याने घटना दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि ठराव केला गेला, असे इतिवृत्तात म्हटले आहे.
या वाक्यांमधूनच आणखी घोळ निर्माण होऊन महामंडळाने केलेली बनवाबनवी समोर आली आहे. २० मे २०१२ या दिवशी पुण्यात झालेल्या सभेत विश्व मराठी साहित्य संमेलन तसेच वाढीव मतदारसंख्येच्या घटना दुरुस्तीचा ठराव मुळात मंजूरच झालेला नाही. कारण हे दोन्ही विषय आयत्या वेळी आणले गेल्याने चर्चेलाही आले नव्हते. इतकेच नाही तर आयत्या वेळी असा विषय आणून त्याला मान्यता घेण्याच्या प्रयत्नाविषयी बातमी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्याने घटना दुरुस्तीचा ठराव मंजूर झाला नव्हता. घटना दुरुस्तीला अंतिम स्वरूप देणे, सूचक आणि अनुमोदकासह ठराव मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, महामंडळाच्या एकूण सदस्यांच्या २/३ संख्येत त्याला मंजुरी मिळणे, मंजूर केलेले ठराव धर्मादाय आयुक्तांकडे पाठवून त्यांची मान्यता मिळणे आदी तांत्रिक बाबी अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. तसेच या इतिवृत्तात ‘मसुदा मान्य करण्यात आला’ असे म्हटले आहे. मसुदा मान्य करणे म्हणजे ठराव मंजूर करणे असे होत नाही. त्याला कोणतीही वैधता नाही. तसेच महामंडळाच्या कोणत्याही इतिवृत्तात २/३ संख्येने घटना दुरुस्तीचा ठराव सूचक व अनुमोदकासह मंजूर झाल्याची कोणतीही नोंद नाही, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.