राज्यातील वनक्षेत्रपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वन्यजीव व्यवस्थापन आणि उत्पादन वानिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील वन प्रशिक्षण केंद्राचे वन अकादमीत रूपांतर करण्यात आले होते. सर्वाधिक जंगल आणि व्याघ्रप्रकल्प व अभयारण्य विदर्भात असताना वन अकादमी सांगलीत का, यावरून वने आणि वन्यजीवप्रेमींनी प्रचंड ओरड केली होती. मात्र, नव्याने स्थानापन्न झालेल्या सरकारने आता चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून वन अकादमीत रूपांतर करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
वनखात्याकडे सध्या वनरक्षक आणि वनपाल यांना प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर, चिखलदरा, पाल, जालना, शहापूर या ठिकाणी पाच वन प्रशिक्षण संस्था आहेत. मात्र, महाराष्ट्रातील वनक्षेत्रपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वन्यजीव व्यवस्थापन आणि उत्पादन वानिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही. राज्यातील वनक्षेत्रपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना डेहरादूनसारख्या दूरच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याठिकाणी अपुऱ्या जागा असल्याने या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागते. सर्वाधिक जंगल आणि वनक्षेत्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात असताना तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी त्यांच्या जिल्ह्यात वन अकादमी खेचून नेली. यावर या जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता. मात्र, आता चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून त्यास वन अकादमीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या अकादमीचे नाव आता ‘चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी’ असे करण्यात येईल. राज्याचे नवे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या सोमवारी लोकसत्ताच्या व्यासपीठावर बोलताना या निर्णयाचे सूतोवाच केले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे अखेर आज हा निर्णय झाला. या वन अकादमीमार्फत वन्यजीव व्यवस्थापन आणि वानिकी उत्पादनविषयक प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, या अकादमीला शासनातर्फे १०० टक्के अनुदान देण्यात येईल.
या अकादमीमध्ये दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करुन देण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे तसेच वनखात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करणार आहे. यामध्ये तांत्रिक तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. या अकादमीसाठी नऊ पदांच्या निर्मितीस तसेच चार पदे बाहेरून भरण्यास आणि इमारतीच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest academy to be set up at chandrapur district
First published on: 28-11-2014 at 01:04 IST