माजी खासदार अशोक मोहोळ यांचा मुलगा सिद्धार्थ (वय ३०) याने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरात छातीत सुरी खुपसून आत्महत्या केली. नवी पेठ येथील मोहोळ यांच्या बंगल्यात ही घटना घडली.
सिद्धार्थ हा मानसिक विकाराने आजारी होता. त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. गुरुवारी दुपारी मोहोळ यांचे दुसरे चिरंजीव अजिंक्य, त्यांची पत्नी तसेच अशोक मोहोळ यांच्या पत्नी आदी सर्व जण घरी होते. अशोक मोहोळ हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. दुपारी सिद्धार्थ स्वयंपाकघरात गेला. तेथील सुरी घेऊन त्याने छातीत खुपसली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिद्धार्थला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
छातीत डाव्या बाजूने खुपसलेली सुरी खोलवर गेल्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मोहोळ हे मुंबईतून पुण्यात दाखल झाले. त्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते व नेत्यांनी मोहळ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.