रहस्यमय किंवा थरारपट म्हटले की प्रेक्षकाला पुढे काय होणार याची उत्सुकता, उत्कंठा असते. उत्कंठावर्धक रहस्यमयपट यशस्वी ठरतो. ‘सूत्रधार’ हा चित्रपट मात्र ना उत्कंठा निर्माण करत, ना मनोरंजन करत. दिग्दर्शकाचा आधीचा चित्रपट पाहिलेले प्रेक्षक काही अपेक्षेने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायला गेले तर त्यांच्या पदरी निराशाच पडेल. सूत्र नसलेला ‘सूत्रधार’ असा हा चित्रपट म्हणावा लागेल.
दिनेश देवकर हा मंत्र्यांचा मुलगा आणि त्याचे चार-पाच मित्र-मैत्रिणी पार्टीला जातात. तिथून त्यांचे अपहरण केले जाते आणि बंद खोलीत त्यांना डांबले जाते आणि मग सुरू होतो इंटरनेटद्वारे सट्टा लावण्याचा खेळ. हा सट्टा म्हणे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. प्रत्यक्षात केवळ सहा लोक एका खोलीत बसून सट्टा लावतात, बुकी म्हणून काम करतात.
इंटरनेटच्या माध्यमातून शेकडो, हजारो लोकांपर्यंत हा ऑनलाइन गेम पोहोचतो, पण पोलिसांना मात्र हा खेळ थांबविता येत नाही. पोलीस आयुक्ताच्या भूमिकेतील अलका कुबल भांबावून जातात. दिनेश देवकरचे वडील असलेले मंत्री विनय आपटे वारंवार मुलाच्या अपहरणाची चौकशी करतात. पण पोलिसांना हा जीवघेणा ऑनलाइन गेम थांबविता येत नाही. मग पाचारण केले जाते एन्काऊण्टर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर सलीम खान याला. इंटरनेटद्वारे खेळल्या जाणाऱ्या गेमची उकल करण्यासाठी सायबर गुन्हे शाखा कामाला लागते आणि प्रत्यक्षात हा खेळ कुठे सुरू आहे ते शोधण्यासाठी इन्स्पेक्टर सलीम खानला पाचारण केले जाते. मग खबऱ्यांकडून माहिती काढून अतिशय तकलादू पद्धतीने सलीम खान खेळाचा पर्दाफाश करतो.
चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या अभिनेत्याने सलीम खानची भूमिका साकारली आहे. दिनेश देवकर ही व्यक्तिरेखा सुशांत शेलारने केली आहे. पहिल्याच भडक आणि कर्कश गाण्याने प्रेक्षकाचा चित्रपटातला रस निघून जातो. आणि त्यापुढे घडणाऱ्या एकामागून एक हास्यास्पद प्रसंगांनी रहस्याची उकल व्हावी, अशी उत्कंठाच प्रेक्षकाला राहत नाही. पटकथेमध्ये काहीही सूत्र नसलेला हा चित्रपट आहे. सुरुवातीच्या प्रसंगामध्येच बडय़ा धेंडांच्या मुलामुलींचे अपहरण केले जाते. पण दिनेश देवकर आणि त्याच्या मित्रमैत्रिणींची मैत्री, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, कोणत्या बडय़ा धेंडांची ही मुले आहेत याचे कुठलेच सूत्र दिग्दर्शकाने प्रस्थापित न केल्याने चार-पाच मित्रमैत्रिणी पडद्यावर येतात आणि अचानक पबमध्ये जाऊन नाचतात, धिंगाणा घालतात एवढेच प्रेक्षकाला कळते. त्याउपर आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे पब, डिस्कोमध्ये ही मुले डान्सबारमध्ये उडवतात तशा पद्धतीने पैसे उडविताना दिग्दर्शकाने दाखविले आहे. अदिती सारंगधरने टीव्ही पत्रकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे सगळे चित्रण खूपच ढोबळपणे केले आहे. रहस्य शेवटी उकलते तेव्हा तर हास्यास्पद प्रसंग घडतो. इन्स्पेक्टर सलीम म्हणे केवळ चष्म्याच्या फ्रेमवरून आपल्याच प्राध्यापकांचा हा चष्मा असल्याचे ओळखतो. आता एका चष्म्यासारखे अनेक चष्मे असतात. त्यामुळे लेखक-दिग्दर्शकाने तर्कविसंगतपणाची कडी केली आहे, असेच म्हणावे लागेल. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या बाहेरची पाटी पाहून हे सायबर गुन्हे शाखेचे कार्यालय आहे की एखाद्या पतपेढीची शाखा, असे वाटून जाते. त्यामुळे एकूणच सिनेमाच्या कोणत्याच विभागात सूत्र नसलेला असा हा चित्रपट आहे.
सूत्रधार
निर्माते- विनोद पाटील, मिलिंद साळवी, उमेश महाडिक, यश शेट्टी, धीरेन पोपट
दिग्दर्शक- प्रतीक कदम
कथा-पटकथा-छायालेखन -अनिकेत के.
संगीत- आनंद मेनन
संकलन- हर्षद वैती
कलावंत- चिन्मय मांडलेकर, सुशांत शेलार, विनय आपटे, अदिती सारंगधर, भूषण घाडी, पूर्वा पवार, शेखर फडके, कमलेश सावंत, नयन जाधव, अबी फिझाडरे व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2013 रोजी प्रकाशित
सूत्र नसलेला ‘सूत्रधार’
रहस्यमय किंवा थरारपट म्हटले की प्रेक्षकाला पुढे काय होणार याची उत्सुकता, उत्कंठा असते. उत्कंठावर्धक रहस्यमयपट यशस्वी ठरतो.
First published on: 01-09-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Formulaless sutradhar a marathi movie