कपीलधार येथील मन्मथस्वामींचे समाधीस्थळ हे वीरशैव समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सामाजिक समतेची बीजे रुजवली. समाजक्रांतीचे मर्म बसवेश्वरांच्या वचन साहित्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा संख्येने भाविक येतात. या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्र म्हणून करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन कपीलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र कपीलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त मन्मथस्वामींच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठय़ा संख्येने आले होते. यावेळी धर्मसभेचे उद्घाटन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धर्मसभेचे संयोजक सोमलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर, सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरा, शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मांजरसुंबा, करवबसव शिवाचार्य महाराज वसमत, राजेश्वर शिवाचार्य महाराज तडोळा, महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी, आमदार शंकरअण्णा धोडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, वीरशैव समाज हा राज्यापुरता मर्यादित नसून देशभरात तो विखुरलेला आहे. अठरा पगड जातींना या समाजाने सामावून घेतले आहे. सदाचार हा स्वर्ग व दुराचार हा नर्क हे सोपे व सुटसुटीत तत्त्वज्ञान बसवेश्वरांनी सांगितले. शरण चळवळीने मनुष्याच्या आत्मकल्याण व समाजकल्याणाबरोबर उत्क्रांतीचा वेग वाढविला. अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी वचन साहित्य निर्माण केले. सैरभैर व चंचल मनाला स्थिर करण्यासाठी अजून कोणताही शोध लागलेला नाही, यासाठीच अध्यात्म व भक्तीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four crores granted for kapildhar temple
First published on: 04-12-2012 at 01:21 IST