दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील दांडेकर टेक्निकल इन्स्टिटय़ूटचे संस्थापक ज. पां. दांडेकर यांच्या स्मृतीनिधीतून सहा गरीब निराधार व्यक्तींना शिवण यंत्रांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
दांडेकर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक पारितोषिक वितरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी स्वत: डिझाइन केलेल्या ड्रेसेसच्या फॅशन शो ने झाली. शिक्षिका पूजा ठाकूर व शीतल बोरा यांनी त्याचे नियोजन केले. गुणदर्शन कार्यक्रमासाठी रश्मी गोरडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव वैजयंती पवार यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्या सॅव्ही कॉलेज ऑफ फॅशनच्या संचालक श्रुती भुतडा यांनी फॅशन शोची दारे सर्वासाठीच दांडेकर इन्स्टिटय़ूटने खुली केल्याचे सांगितले. यानंतर प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्राजक्ता बस्ते यांनी विद्यार्थिनींनी साधेपणातही सौंदर्य असते हे दाखवून दिले. हा वसा आजपर्यंत जपला तसाच यापुढे जपावा असा सल्ला दिला. प्राचार्य मानसी देशमुख यांनी आभार मानले.