मोहोळ तालक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या शिरापूर या गावात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विशेषत: महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील सर्व कूपनलिका बंद पडल्या असून विहिरीही आटल्या आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या शेतातील उसाच्या पिकाकडे दुर्लक्ष करून अनिल पाटील या शेतकऱ्याने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वखर्चाने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे.
अनिल पाटील यांची शिरापूर गावात चार एकर उसाची शेती असून, या पिकाला पाणी न देता शेतातील कूपनलिकेतून गावाला मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम पाटील यांनी हाती घेतला आहे. गेल्या २६ जानेवारीपासून हा उपक्रम नित्यनियमाने सुरू आहे. शेतातील कूपनलिकेतील पाणी स्वत:च्या टेम्पोतून गावात आणले जाते. गावात पाच हजार लीटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ते गावकऱ्यांना वितरित केले जाते. पाणीपुरवठय़ासाठी टेम्पोच्या दररोज पाच खेपा होतात. त्यासाठी दररोज सुमारे एक हजाराचा खर्च होतो. हा खर्च अनिल पाटील हे स्वत: पदरमोड करून भागवतात. राजकारणापासून चारकोस दूर असलेले अनिल पाटील हे गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देत असताना त्यांचा स्वत:चा चार एकर ऊस जळाला तसेच त्यांचा मुलगा सुनील पाटील हा सोलापुरात एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना केवळ शुल्क भरले नाही म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून तो शिक्षणापासून वंचित आहे. त्याचे शैक्षणिक भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे. आर. पी. ग्रुपचे सदस्य असलेल्या पाटील यांच्या सेवाकार्यामुळे गावातील महिला त्यांना देवदूत मानतात.