स. गो. बर्वे चौकात शिवाजीनगर टपाल कार्यालयाजवळ सुरू असलेल्या समतल विलगकाच्या (ग्रेड सेपरेटर) कामाजवळ जलवाहिनी फुटल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली.
 परिणामी या चौकाला जोडणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुक्रवारी दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. स. गो. बर्वे चौकामध्ये मागील काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी रस्ता खोदण्यात येत आहे. रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी रात्री काम सुरू असताना या भागातील जलवाहिनी फुटली. त्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याने व्यापून गेला. त्यातच रस्त्याचा काही भाग खचला.
 त्यामुळे अत्यंत धिम्या गतीने वाहतूक सुरू होती. काही वेळाने शिवाजी रस्त्यावरून येणारी वाहतूक वळविण्यात आली. त्यासाठी सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. या गोंधळात वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्याने वाहतुकीची कोंडी झाली. बर्वे चौकातील या प्रकाराने शिवाजी रस्ता, फग्र्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, घोले रस्ता आदी रस्त्यांसह त्यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. सकाळपासूनच या रस्त्यावर कासवगतीने वाहतूक सुरू होती.
या सर्व रस्त्यांवर तातडीने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक शाखेचे कर्मचारी पाठविण्यात आले. सर्व रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा बंद करून वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमन करणे सुरू केले. मात्र, वाहनांची प्रचंड संख्या लक्षात घेता वाहतुकीची कोंडी टाळता आली नाही. या सर्वच प्रमुख रस्त्यांवरील सर्वच चौकात वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडले. अभियांत्रिकी महाविद्यालय चौकापासून पुणे- मुंबई महामार्गावर वाकडेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वाधिक प्रमाणात वाहने रस्त्यावर येण्याच्या सकाळ व संध्याकाळच्या वेळी अनेक वाहनचालक रस्त्यावर अडकून पडले होते. कोंडीतून सुटण्यासाठी अर्धा ते एक तास लागत होता. त्यामुळे वाहनचालकांकडून तीव्र संपात व्यक्त करण्यात येत होता.