शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण तसेच राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असतानाचे एक प्रकरण यावरून न्यायालयाच्या कचाटय़ात सापडलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांची नववर्षांत पर्यावरणाविषयीची आस्था चांगलीच उफाळून आली आहे. जुन्या वर्षांतील कटू आठवणी लक्षात घेऊन बहुदा पर्यावरणाशी मैत्री करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश त्यांनी नववर्षांच्या शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून दिला आहे.
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदुषणावरून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने जनहित याचिका दाखल केली आहे. गटारीचे पाणी शुद्धीकरण न करताच पात्रात सोडले जात असल्याने या प्रदूषणास पालिका जबाबदार असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या कारणास्तव प्रशासन प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकिकडे हा विषय चर्चेत असतानाच यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना दुसरीकडे पर्यावरणाशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने आयुक्तांवर ताशेरे ओढल्याचे निदर्शनास आले होते. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, आयुक्त संजय खंदारे यांनी नववर्षांच्या शुभेच्छापत्रात पर्यावरण संकल्पनेची केलेली निवड चर्चेचा विषय ठरली आहे. ‘स्वप्न नवे २०१३’ या हिरवाईने नटलेल्या शुभेच्छापत्रात दिलेला संदेश लक्षात घेण्यासारखा आहे.
एक रोप अंगणात लावून
यंदा साजरे करू नव वर्ष,
पर्यावरणाशी मैत्री करून
मिळवू सदा सुखाची सावली
अक्षय सुख, शांती, समृद्धीचे
हे बीज आपणच पेरायला हवे,
निसर्गाशी एकरूप होऊनच
उज्वल भविष्य घडवायला हवे..!
या संदेशाच्या माध्यमातून आयुक्तांनी पर्यावरण विषयावर आपण किती सजग आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. गोदावरी प्रदूषण असो, वा प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रकरण, या पर्यावरणाशी निगडीत बाबींवरून त्यांना न्यायालयात आपली बाजू मांडावी लागत आहे. प्रदूषण मंडळाचा कार्यभार सोडल्यानंतर पर्यावरणाशी संबंधित विषयावरून आपण दूर गेलो, असे त्यांना वाटले असले तरी नाशिकमध्ये जेव्हा त्यांचे आगमन झाले, तेव्हा नेमका गोदावरी प्रदूषणाच्या विषयावरून जनहित याचिका दाखल केली गेली. मागील वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे त्यांना शुभेच्छा पत्रात पर्यावरणाचा जागर करण्याची उपरती झाली असण्याची एक शक्यताही पालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे.