खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम निधीमधून कोल्हापूर शहराकरिता अत्याधुनिक ट्रामा केअर युनिटसह इतर कामांकरिता एकूण ६९ लाख रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षांत वितरित झाल्याची माहिती खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दिली.    
या संदर्भात खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर महापालिकेकरिता खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सर्व सोयीनियुक्त ट्रामा केअर युनिट पुरवण्याकरिता१८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर घटनास्थळी प्राथमिक उपचार सत्वर होण्याकरिता या ट्रामा केअर युनिटमध्ये एका प्रशिक्षित डॉक्टरासह नर्स, कंपाऊंडर व ड्रायव्हर चोवीस तास या युनिटमध्ये असणार आहेत. सध्या हे ट्रामा केअर युनिट महापालिकेकडे सुपूर्द केले असून, महापालिकेच्या हद्दीमध्ये या ट्रामा केअर युनिटद्वारे रुग्णांना मोफत सुविधा देण्यात येणार आहेत.    
दरम्यान, कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणचे रस्ते हे वाहतुकीच्या दृष्टीने खराब झाले असल्याने या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे म्हणून स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सुमारे अर्धा कोटी रुपयांचा निधी रस्ते, गटारी, ड्रेनेज लाइन, क्राँक्रीटीकरण आदी मूलभूत कामांकरिता वितरित झाल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.