सातत्याने पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही निगरगट्ट झालेले पालिकेचे अधिकारी सोळाशे विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना साधी मुतारी बांधून देत नसल्याने संतापलेल्या एका माजी नगरसेवकाने शाळेतील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी पालिकेच्या आलिशान मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना गुलाबाची फुले देऊन गांधीगिरीचे दर्शन घडविले. त्यापुढे जाऊन आयुक्तांच्या मार्गात फुलांच्या कळ्या पसरविण्यात आल्या होत्या. पालिका शाळेतील लहान लहान मुलींच्या भावना कशा पायदळी तुडविल्या जात आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न या कुस्करलेल्या कळ्यांच्या पायघडय़ातून विद्यार्थिनी आणि माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी केला.  
नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील गौतमनगर येथे मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय ही पालिकेची शाळा क्रमांक ७८ आहे. या ठिकाणी एक हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवी मुंबईतील जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळा तोडून त्या ठिकाणी नवीन शाळा बनविण्याचे व्हिजन स्कूल घेण्यात आले आहे. त्यामुळे दीड कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन शाळा बांधली जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन आता चार वर्षे लोटली. नवीन शाळा बांधायची आहे म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने साधे शौचालय या ठिकाणी बांधलेले नाही. सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ढिम्म प्रशासन जागेचे हलत नसल्याने येथील माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे यांच्या सहनशीलतेचा बांध शुक्रवारी फुटला. त्यांनी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना घेऊन पालिकेचे बेलापूर येथील आलिशान मुख्यालय गाठले. शुक्रवारी जून महिन्याची सभा असल्याने सर्व अधिकारी, नगरसेवक ज्या मार्गाने मुख्यालयात प्रवेश करणार होते, त्या ठिकाणी रांगेत विद्यार्थ्यांना उभे केले आणि येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला गुलाबाची फुले वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे पहिल्यांदा मोठय़ा खुशीने फुले हातात घेणाऱ्या अधिकाऱ्यांना काही वाटले नाही, पण ज्या वेळी ही फुले म्हणजे अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा असल्याचे कळल्यानंतर या अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना फुले दिल्यानंतर सोनावणे यांनी हे आंदोलन संपविले, पण याच वेळी प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत काही फुलाच्या पाकळ्या पसरवून ठेवल्या. त्यामागे अधिकाऱ्यांनी त्या तुडवून जाव्यात अशी योजना होती. या पाकळ्या म्हणजे शाळेतील लहान मुलींच्या भावना असून अधिकारी त्या कशा पायदळी तुडवत आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न सोनावणे यांनी अतिशय सनदशीर मार्गाने केला. त्यामुळे या शाळेत तात्काळ मोबाइल टॉयलेट पाठविण्याचे आदेश आयुक्तांना द्यावे लागले.
 राज्यातील इतर शहरांत विद्यार्थ्यांची गळती सुरू असताना नवी मुंबईत सुमारे ४० हजार विद्यार्थी पालिकांच्या शाळेतून शिक्षण घेत आहेत. शाळा व्हिजन वगैरे नावाने शाळा सुधार करणाऱ्या पालिकेला साधे शौचालय देता येत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनावणे यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने एक आडोसा निर्माण करून दिला आहे, पण पालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी कधी जावे असे वाटले नाही. रबाळे झोपडपट्टी भागात मामा या नावाने परिचित असलेले माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे यांच्या या प्रभागातील भरीव कार्यामुळे त्यांची मुलगी डॉ. गौतमी व पत्नी रंजना या दोघी नगरसेविका आहेत. त्यांच्या प्रभाग क्रमांक १८ मधील छत्रपती शाहू महाराज विद्यालय हे संपूर्ण नवी मुंबईतील आदर्श विद्यालय म्हणून ओळखले जात असून सोनावणे या शाळेकडे जातीने लक्ष देत असतात. झोपडीत राहणाऱ्या सोनावणे यांनी आपल्या मुलीला डॉक्टर करून शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांकडे त्यांची करडी नजर आहे. छत्रपती शाहू महाराज शाळेत चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून दहावीच्या परीक्षेतही येथील विद्यार्थी अव्वल ठरले आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhigiri of ex corporaters for toilet
First published on: 21-06-2014 at 07:56 IST