केबीसी घोटाळ्यात हात पोळल्या गेलेल्या हजारो ठेवीदारांसाठी आंदोलन छेडणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक गणेश कदम, छावा मराठा संघटनेचा जिल्हाध्यक्ष करण गायकर व इतर साथीदारांविरोधात महिलेला धमकावत एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील संशयित गायकरविरुद्ध याआधी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणीप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. दोघांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बुधवारी आयोजिलेल्या मेळाव्यादरम्यान आंदोलनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून तो हाणून पाडला.
या संदर्भात कल्पना दिघे यांनी तक्रार दिली. नाशिक-पुणे रस्त्यावरील फेम चित्रपटगृहासमोर त्यांचे कार्यालय आहे. संशयित कदम, गायकर व त्यांच्या साथीदारांनी वारंवार पैशांची मागणी करून खंडणीसाठी धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही ग्राहकांची फसवणूक करत आहात. त्यांचे पैसे दिले नाहीत, तर कार्यालयाची तोडफोड करू, वृत्तपत्रातून बदनामी करू, अशी धमकी देत संबंधितांनी एक लाख रुपयांचा धनादेश मागितला. ही रक्कम शक्य नसल्यास प्रत्येक दलालाचे एक हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करावे, असे संबंधितांनी सांगितले. आम्हाला पैसे दिल्यास तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, याची शाश्वती कदम व गायकरने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर दोघांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात ज्या संशयितांना अटक झाली, ते केबीसी ठेवीदार कृती समितीचे प्रतिनिधित्व करत आहे. केबीसीच्या संचालकांनी राज्यभरातील हजारो ठेवीदारांना गंडा घालून दीडशे कोटीहून अधिक रक्कम हडप केली. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी संबंधितांनी केबीसी ठेवीदार कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीचा मेळावा बुधवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आला. कदम व गायकरला अटक झाल्याची माहिती समजल्यानंतर समर्थकांनी आंदोलनाचा इशारा दिला. परंतु, या ठिकाणी आधीपासून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परवानगी न घेता आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या मुद्दय़ावरून काही काळ शाब्दिक वादावादीही झाली. छावा मराठा संघटनेचा जिल्हाध्यक्ष गायकरविरुध्द आधी खंडणी मागितल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. केबीसी गुंतवणूकदारांच्या आंदोलनाचे नेतृत्व संबंधितांनी हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या भुवया उंचावल्या होत्या. या ठेवीदारांना समिती कितपत न्याय देऊ शकली, हा प्रश्न अनुत्तरित असताना आता महिलेला धमकाविण्याचा प्रकार पुढे आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh kadam karan gaikar arrested under extortion charges
First published on: 11-09-2014 at 08:44 IST