कर्जत येथे कै. पै. दिलीप तोरडमल यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांच्या स्पर्धेत ३ किलो चांदीच्या गदेचा मानकरी ठरला तो कोरेगावचा पहिलवान गणेश शेळके. त्याने कोल्हापूरचा न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल संभाजी मिसाळ याला अवघ्या एका मिनिटात घिस्सा डावावर अस्मान दाखवताच जोरदार जल्लोष झाला व कर्जतच्या हा लाडका पहिलवान मानाच्या गदेचा मानकरी ठरला. या निकालानंतर गणेशच्या समर्थकांनी त्याची आखाडय़ातच मिरवणूक काढली.
कर्जत तालुक्यामधील गाजलेले पहिलवान दिलीप तोरडमल यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, सदाशिव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, बाळासाहेब साळुंके, दीपक शिंदे, अशोक खेडकर, प्रवीण घुले, नानासाहेब निकत, विजय मोढळे, काका शेळके, अंबादास पिसाळ, स्पर्धेचे संयोजक विजय तोरडमल, अशोक तोरडमल, राजमुद्रा गुपचे सर्व कार्यकर्ते व कै. दिलीप तोरडमल क्रीडासंकुलातील सर्व पहिलवान तसेच कुस्ती शकीन या वेळी उपस्थित होते.
कुस्तीच्या या मैदानात कर्जत तालुक्यातील पहिलवानांनी आपला ठसा उमटवताना अनेक पहिलवानांना अस्मान दाखवले. प्रत्येक विजयाबरोबर प्रेक्षक जल्लोष करीत होते. क्रमांक एकच्या कुस्तीसाठी शंकरराव मोहिते, पुणे व श्रेणीकशेठ खाटेर, करमाळा यांनी ३ किलो चांदीची गदा ठेवली होती. त्यावर गणेश शेळकेने आपले नाव कोरले. याशिवाय कर्जतच्या दादा जंजिरे याने आष्टीच्या शरद राणे याला अस्मान दाखवले, विनोद मुरकुटे याने कल्याण कसाब याचा पराभव केला.
सर्वात देखणी कुस्ती केली ती अजित शेळके याने काष्टीच्या सुरेश पालवे याला अस्मान दाखवताना त्याने अतिशय चपळता दाखवली व उपस्थित प्रेक्षकांच्या डोळयांचे पारणे फेडले. हरि मुरकुटे, दादा मुरकुटे, विक्रम शेटे, संतोष सुद्रिक, सागर फणसे, सनी जाधव, सोमनाथ तोरडमल, कार्तिक राघवन, विकास तोरडमल, अक्षय खरात, अक्षय खराडे, हर्षवर्धन पठाडे, सागर ससाणे यांनीदेखील प्रेक्षणीय कुस्त्या करीत विजय मिळवला. विजयी पहिलवानांना विजय तोरडमल व वस्ताद ईश्वर तोरडमल व ज्योतिराम साबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.