दोन तास रास्ता रोको,
कुटुंबासह घरावर मोर्चाचा इशारा
गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने येत्या दोन दिवसात राजीनामा न दिल्यास कारखान्याचे कामगार कुटुंबासह त्यांच्या घरी जाऊन राजीनामा घेतील असा इशारा कामगार नेत्यांबरोबरच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिला. दरम्यान बेकायदा जमाव जमवून रास्ता रोको आंदोलन करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती गोरे यांच्यासह ४०० ते ५०० जणांविरुध्द राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गणेश कारखान्याच्या कामगारांनी गेल्या नऊ दिवसांपासून कारखाना कार्यस्थळावर साखळी उपोषण सुरु केले होते. आज राहाता येथे शिवाजी चौकात नगर-मनमाड राज्यमार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी झालेल्या सभेत वरीलप्रमाणे इशारा देण्यात आला. २७ महिन्यांपासून कामगारांचे पगार थकीत आहेत. या थकीत पगाराची रक्कम १७ कोटी ४६ लाख रुपये होते, तर शेतकरी, सभासद व उस उत्पादकांचे जवळपास १६ कोटी रुपयांचे देणे असून कारखान्यास ७६ कोटी रुपयांचा तोटा आहे. अकार्यक्षम संचालकांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांची कामधेनू असलेला गणेश कारखाना बंद पडला याचे दु:ख होते. गणेश पूर्ववत चालावा ही कामगारांची इच्छा आहे असे गोरे यांनी यावेळी सांगितले. कामगार नेते नारायण िपजारी, गणेशचे माजी संचालक मोहनराव सदाफळ, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेखर बोऱ्हाडे, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, मनसेचे उपतालुकाप्रमुख विजय मोगले, शेतकरी संघटनेचे अशोक पठारे, भाजपाचे डॉ.स्वाधिन गाडेकर, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक संजय सदाफळ, भाऊसाहेब शेळके, सुलोचना भागवत व विलास उगले यांची भाषणे झाली. दोन तासानंतर तहसीलदार आप्पासाहेब िशदे यांना आंदोलन कर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वहानांच्या मोठय़ा प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.