रविवारपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या आगोदर येणारी आषाढ अमावस्या ‘गटारात लोळून’ साजरी करण्याचे गटारी मनसुबे गल्लोगल्ली आणि नाक्यानाक्यावर रचले जात आहेत. हल्ली गटारी साजरी करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. घरी आणि बाहेर अशा दोन प्रकारे गटारी साजरी केली जाते. ‘बाहेर’च्या गटारीसाठी स्वाभाविकच धबधबे, नदी, नाले, झरे अशा निर्सगसन्निध जागांना पसंती दिली जाते. मात्र त्याठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिक अथवा थर्माकोलच्या पत्रावळी, स्नॅक्सचे वेष्टण यासारख्या कचऱ्याचे प्रमाण ‘गटारी’ स्थळांवर वाढत असल्याचे दिसून येत आहे. भरीला ‘मद्यधुंदी’त तोडली जाणारी झाडे, रोपे, वेली आदींचाही समावेश आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकारांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष अशा प्रकारांना एकप्रकारे खतपाणीच घालते.
रबाले रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरवर असलेला गवळीदेव धबधबा काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. प्रवासाच्या दृष्टीने जवळ असणाऱ्या या पर्यटन स्थळाचे पावसाळ्यातील सौंदर्य अधिक खुलून जाते. या डोंगराच्या समोर असणाऱ्या तळवली, गोठवली, घणसोली गावातील ग्रामस्थांची गाई-गुरे या डोंगरावर चरण्यास येत असल्याने त्याला गवळीदेव असे नाव पडले. नोसिल कंपनीने या डोंगरावर हिरवळ वाढवली. त्यासाठी कंपनीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते डोंगराच्या मध्यापर्यंत नेण्यात आले. त्यामुळे हा डोंगर हिरवागार होऊ शकला. या स्थळाचा विकास करण्याचे आता वनविभागाने ठरविले असून त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये नवी मुंबई पालिका देणार आहे. त्यामुळे तेथे अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. एकीकडे हे स्तुत्य प्रयत्न होत असतानाच या स्थळाचा ऱ्हाससुद्धा सुरू आहे. त्याकडे वनविभाग, पालिका, पोलीस यांचे दुर्लक्षच आहे. या हजारो एकर डोंगराच्या कानाकोपऱ्यात गटारी साजरी होते. कचरा करणे एवढेच या ‘गटारीबाजां’ना माहीत असते. परिणामी शेकडो टन घनकचरा या डोंगरातून अनेक सामाजिक संस्था दरवर्षी काढत असतात.
हीच स्थिती बेलापूरपासून पाच किलोमीटरवरील खारघरजवळच्या पांडवकडा धबधब्याची होती. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ‘गटारीबाजां’ना काही प्रमाणात चाप बसला आहे. या धबधब्याजवळ जातानाच पर्यटकांच्या पिशव्या तपासणी केल्या जात असल्याने दारूला पायबंद बसला आहे. मात्र प्लास्टिकचा भस्मासुर येथेही वाढत आहे.
पर्यावरणाचा नाश करू नका, निसर्गाची हानी करू नका, असा आक्रोश ऐन गटारीच्या दिवशी करून ‘गटारीबाजां’ना काहीही फरक पडणार नाही. परंतु गटारीच्या रंगात रंगण्याआधी तरी त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, ही अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gatari amavasya set to sizzle
First published on: 25-07-2014 at 02:05 IST