मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा शुल्कात उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच संस्थेने सुरू केलेले स्वस्त औषध दुकान हजारो गरजूंसाठी अतिशय उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गुलाब निनावे यांनी केले.
डॉ. वसंत पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सुरू केलेल्या स्वस्त औषध दुकानाचे (जेनेरिक मेडिसीन स्टोअर) उद्घाटन करताना ते बोलत होते. या प्रसंगी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती नानाजी दळवी, संचालक मुरलीधर पाटील, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. विश्राम निकम, भरत कापडणीस, भाऊसाहेब पाटील, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, डॉ. अविनाश पुलाटे, औषध निरीक्षक आर. व्ही. पांडोळे, शिक्षणाधिकारी रामनाथ चौधरी उपस्थित होते. हे  दुकान रुग्णांसाठी २४ तास सुरू राहणार आहे. मधुमेह, रक्तदाब, अस्थमा यांसारख्या प्रदीर्घ उपचारांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांच्या खर्चात मोठी बचत होईल, असा विश्वास नीलिमा पवार यांनी व्यक्त केला आहे. डॉ. पवार जयंतीनिमित्त आयोजित मविप्रमधील निवृत्तसेवकांच्या आरोग्य तपासणीत १५०हून अधिक निवृत्तसेवकांच्या तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य शिबिराच्या आयोजनात पी. के. ठोंबरे आणि सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.