दिवसा प्रवासी, कर्मचारी आदींच्या धावपळीत हरवणारे नाशिकरोड रेल्वे स्थानक बुधवारी पहाटेच्या अंधुक प्रकाशात उजळून निघाले. मराठीचा लिला लावत, ढोल-ताशांच्या गजरात.. भगव्या पताका फडकवत.. वासुदेवाच्या अभंगवाणीत नाशिककर साहित्यप्रेमी, विद्यार्थी रेल्वे स्थानकातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेगाडीने ‘घुमान’ला रवाना झाले.
पंजाबमधील घुमान येथे ३ ते ५ एप्रिल या कालावधीत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी संत नामदेव एक्स्प्रेस, गुरूनानक एक्स्प्रेससह नाशिक येथून रेल्वेचे नियोजन करण्यात आले होते. संमेलनासाठी निघालेली ही विशेष गाडी चुकू नये यासाठी साहित्यप्रेमींनी मंगळवारी रात्री उशिराने स्थानकात येण्यास सुरुवात केली. नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून नियोजित वेळेत अर्थात पहाटे पाच वाजता रेल्वेने घुमानकडे प्रस्थान केले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र समन्वयक अरुण नेवासकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते रेल्वेचे पूजन करण्यात आले. संत नामदेव- नानक महाराजांच्या जयजयकारात हिरवा झेंडा दाखवून साहित्य यात्रेस सुरुवात झाली. दरम्यान, पहाटे तीन वाजेपासून रेल्वेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. रेल्वेच्या प्रत्येक बोगीला पुष्पहाराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रत्येक बोगीला साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या साहित्यिकांची नावे देण्यात आली. नियोजित वेळेत स्थानकावर आगमन झालेल्या रेल्वेगाडीला गुलालवाडी ढोल पथकाने स्वागताची सलामी दिली. त्याच्या सोबतीला टाळ-मृदंगाचा गजर, संबळ, भारूड, वासुदेवाची अभंगवाणी या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या कलाविष्काराने उपस्थितांवर गारुड केले. संमेलनास जाणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना त्यांना आवश्यक साहित्यासह मोतिया रंगाचा नेहरू शर्ट, पायजमा हा गणवेश, माहितीपुस्तिका देण्यात आली.
दरम्यान, साहित्ययात्रे संदर्भातील नियोजन नेटके असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी उशिराने उपस्थितांसाठी आयोजकांनी ‘प्रश्नमंजुषा’ घेतली. त्यात साहित्य विषयक प्रश्न विचारण्यात आले. विजेत्यांना पुस्तक स्वरूपात पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले. एक्स्प्रेसमधून तीन हजारांहून अधिक नाशिककर उत्तर महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी संमेलनासाठी रवाना झाले असले तरी बुधवार, गुरुवारी खासगी वाहने व विमानाने अनेक जण संमेलनात सहभाग नोंदविणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत
मराठी साहित्य-संस्कृतीचा मानिबदू असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रथमच राज्याची सीमा ओलांडत बाहेर होत आहे. सुरुवातीपासून संमेलन स्थळ, अध्यक्षपद यावरून वाद-विवाद झाले. मात्र साहित्य मंडळ आणि आयोजकांच्या नियोजनामुळे संमेलन संस्मरणीय होईल अशी साहित्यप्रेमींना अपेक्षा आहे. संमेलनात राजकीय मंडळींचा वावर असावा की असू नये याबाबत विविध मतप्रवाह असले, तरी बुधवारी पहाटे संमेलनासाठी रवाना झालेल्या रेल्वेला किंवा साहित्यप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghuman marathi sahitya sammelan
First published on: 02-04-2015 at 07:57 IST