अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या गोरेगाव येथील आश्रमशाळेत जया अवधुत चक्रनारायण (१४, रा.अंबिकापूर) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. समाजकल्याण विभागाच्या या निवासी शाळेत या मुलीला दोन दिवसांपूर्वीच पालकांनी सोडले होते. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तिचे वडील अवधुत चक्रनारायण यांनी केली.
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोरेगावला अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिकत असलेल्या जया अवधूत चक्रनारायण या मुलीचा शाळेच्या परिसरात मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. सर्व मुली पहिल्या मजल्यावर एकत्र झोपतात त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू झाला नसावा, असा कयास स्थानिक पोलीस यंत्रणेचा होता, तर स्थानिक डॉक्टरांनी तिचा मृत्यू पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय व्यक्त केला. जयाला दोन दिवसांपूर्वीच आश्रमशाळेत सोडल्याची माहिती तिचे वडील अवधुत चक्रनारायण यांनी दिली. तिला आश्रमशाळेत सोडले तेव्हा तिची प्रकृती चांगली होती, असा दावा त्यांनी केला. ते अंबिकापूर येथील रहिवासी असून शेतमजुरी करतात. अवधुत यांना तीन मुले असून जया सर्वात मोठी मुलगी असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात अनुसूचित जाती निवासी शाळेच्या स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप तिच्या पालकांनी केला. जयाचा मृत्यू झाला असतानाही तिची तब्येत खराब आहे, असे कारण पुढे करून माहिती दडविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला.
येथील जिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन झाल्यानंतर पालकांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तिचे शव घेण्यास नकार दिला. दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी तिच्या पालकांनी केली. जयाच्या मृत्यूचे नेमके कारण कोणते, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. गोरेगाव येथील या निवासी शाळेत अनागोंदी कारभार असून येथील महिला कर्मचारी मुलींवर दबाव टाकत असल्याचा पूर्वइतिहास आहे. काही महिन्यांपूर्वी येथील मुलींचे छेडखानी प्रकरण दडपण्याचा प्रकार येथील महिला कर्मचाऱ्यांनी केला होता. त्यामुळे या निवासी शाळेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची गरज आता व्यक्त होत आहे. जयाच्या मृत्यूच्या बातमीने परिवारावर शोककळा पसरली होती. या प्रकरणात छावा संघटनेच्या नेत्याने समाजकल्याण विभागाचे कार्यालय अधीक्षक मालवे यांना रुग्णालयात मारहाण करून कहर केला. मालवे अकोल्यात कार्यालयीन कामकाज पाहतात. त्यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना त्यांना झालेली मारहाण गंभीर बाब आहे. या मारहाणीमुळे अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले होते. समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी पुण्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे जयाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. या निवासी शाळेच्या प्रमुखांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.