अमली पदार्थाचे विष समाजातील सर्व स्तरात वेगाने पसरत जात आहे. तरुण मुले त्याच्या विळख्यात सापडत आहेत, पण आता त्यात मुलींचीही संख्या वाढली आहे. पार्टीमधल्या उच्चभ्रू वर्गातल्या मुलींचे प्रमाण त्यात जास्त आहेत. विशेष म्हणजे आपण कुठले अमली पदार्थ घेतोय याची माहितीही या मुलींना नसते आणि नंतर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
 रुपल मेहता (२२) (नाव बदलले आहे) ही महाविद्यालयीन तरुणी. मित्रासमवेत पब्ज आणि पार्टीत जायची सवय. कौटुंबिक आणि इतर वैयक्तिक समस्यांमुळे ती तणावात असायची. मित्रांनी तिला नैराश्य दूर करण्यासाठी एक अमली पदार्थ दिला. फार नुकसान होणार नाही, पण नैराश्य दूर होईल असे मित्रांनी सांगितले. आपण अमली पदार्थ घेतोय, पण तो कोणता हे तिला माहीत नव्हते. पोलिसांना याची कुणकुण लागली. अमली पदार्थविरोधी शाखेच्या आझाद मैदान युनिटने या मुलीला ताब्यात घेतले. तिची चौकशी सुरू केली. ती सेवन करत असलेले अमली पदार्थ क्रिस्टल असल्याचे ती सांगत होती. परंतु हा अमली पदार्थ सर्वात घातक मानला जाणारा एमडी असल्याचे पोलिसांनी तिला सांगताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. या अमली पदार्थाच्या सेवनाने वर्षांच्या आतच तू जगाचा निरोप घेशील असे पोलिसांनी तिला सांगताच ती कोसळली. पण तिच्यावर कारवाई न करता पोलिसांनी या व्यसनातून तिला बाहेर काढण्यासाठी तिचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. रुपलला अमली पदार्थांच्या भीषण परिणामांची कल्पना मिळाल्यानंतर तिला आपली चूक उमगली आहे. या विळख्यातून बाहेर पडण्याच्या ती प्रयत्नात आहे. याबाबात बोलताना अमली पदार्थविरोधी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांनी सांगितले की, अमली पदार्थाच्या सेवनात मुलींचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. एखादी व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करत असेल तर त्याच्यावर अमली पदार्थविरोधी कायदा (एनडीपीएस अ‍ॅक्ट) अन्वये कारवाई केली जाते. पण तरुण मुलांच्या बाबतीत केवळ त्यांना अटक करणे हा आमचा उद्देश नाही, तर त्यांना यातून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही या मुलांचे पुनर्वसन करतो. त्यासाठी कलम ६४ (अ) चा आधार घेतला जातो. पण त्यांच्यासाठीची पुनर्वसन केंद्रे तुलनेने कमी असल्याचे गोखले यांनी सांगितले.
महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्ज फ्री कॅम्पस म्हणजेच अमली पदार्थमुक्त महाविद्यालय परिसर ही मोहीम पोलिसांतर्फे सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले विद्यार्थी शोधणे, त्यांना यातून बाहेर काढणे हा या मोहिमेतील एक उद्देश आहे. त्यासाठी शिक्षक आणि पालकांचीही मदत घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिनाभरात एमडीचा अमली पदार्थात समावेश?
 या एमडीमुळे वर्षभराच्या आतच सेवन करणारा दगावतो. मुंबईत नुकताच एमडीच्या सेवनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या एमडी या पदार्थाचा अमली पदार्थामध्ये समावेश व्हावा यासाठी नार्कोटिस कंट्रोल ब्युरो तसेच अमली पदार्थविरोधी शाखेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. सध्या एमडीचे विक्री करणारे आणि सेवन करणाऱ्यांवर या कलमाअंतर्गत कारवाई करण्यात अडथळे येत आहेत. महिनाभरात एमडीचा अमली पदार्थात समावेश होऊ शकेल असेही गोखले यांनी सांगितले.

More Stories onमुलीGirls
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls number increase of taking intoxicating drug
First published on: 04-12-2014 at 01:53 IST