चेन्नई येथे एका रेल्वे स्थानकावर चोरीला गेलेल्या तेरा किलो सोन्याच्या दागिन्यांच्या छडा सोलापूर जिल्ह्य़ात लागला असून यात चेन्नईच्या पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तीन किलो सोने हस्तगत केले.
चेन्नईजवळील एका रेल्वे स्थानकावर इरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराफाकडील तेरा किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. परंतु चोरटय़ांनी मोबाइलचा पुरावा शिल्लक ठेवल्यामुळे त्याचा आधार घेत पोलिसांनी तपास हाती घेतला होता. मोबाइल संपर्काचे स्थळ सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा व माढा तालुक्यात दाखविले जात होते. त्यावरून इरोड पोलीस ठाण्याचे पथक सोलापुरात येऊन धडकले. सोलापूर ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन त्यांनी या धाडसी चोरीच्या गुन्ह्य़ाची उकल केली. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथून तिघा जणांना तर माढा तालुक्यातील केवड येथून चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सत्य उजेडात आले. निंभोरे येथील विश्वनाथ जाधव व त्याचा मुलगा सुनील जाधव यांच्यासह तिघा जणांकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच माढा तालुक्यातील काही सराफांनाही ताब्यात घेतले असता त्यांच्याकडेही चोरीचे सोन्याचे दागिने सापडले. हस्तगत केलेले सोने तीन किलो एवढे आहे. आरोपींनी हे चोरीचे सोन्याचे काही दागिने विकून शेतजमिनी खरेदी केल्याचे सोलापूर ग्रामीण पोलीस सूत्रांनी सांगितले. सात संशयितांना पुढील तपासासाठी चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेऊन चेन्नईला नेले.