मोठय़ा रकमेच्या बक्षिसाच्या लालसेने गेलेले ७५ हजार रुपये बँकेच्या शाखाधिका-याच्या प्रसंगावधानामुळे ग्राहकाला पुन्हा मिळाले. फसवणूक झाल्यानंतरही वेळीच पावले उचलल्याने गेलेले पैसे पुन्हा मिळवता आले.
तालुक्यातील दूरगांव येथील शशिकांत बाळासाहेब निंबाळकर यांना बुधवारी एअरटेल कंपनीच्या नावाने फोन आला. कंपनीकडून आपल्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे, त्यासाठी युनियन बँकेचा एक खातेक्रमांक देऊन त्यावर सुरुवातीला ४९ हजार रुपये व नंतर २५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. या कथित बक्षिसाने निंबाळकर कमालीचे खूश झाले. या खुशीतच त्यांनी त्या खात्यावर पैसे भरलेही, मात्र त्यानंतर आपण फसवलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तातडीने युनियन बँकेचे स्थानिक शाखाधिकारी मन्सूर खान यांना या गोष्टीची कल्पना दिली. त्यांनी तातडीने हालचाली करून हा खातेक्रमांक कुठला आहे, ते शोधून काढले. तो उत्तर प्रदेशातील निघाला. तेथील शाखाधिका-याशी त्यांनी लगेचच संपर्क करून त्याला या प्रकाराची कल्पना दिली. त्याने संबंधित खातेदाराला शोधून तेथील पोलिसांच्या हवाली केल्यानंतर मात्र त्याने लगेचच निंबाळकर यांचे ४९ हजार रुपये पुन्हा त्यांच्या खात्यात भरले व उर्वरित २५ हजार रुपयेही लगेचच भरण्याची तयारी दर्शवली. अशा पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात, मात्र गेलेले पैसे पुन्हा मिळाल्याची सुखद अनुभूती निंबाळकर यांना आली.