सामाजिक न्याय विभागातील नाशिक विभागाच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल व निवासी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झाली.
या वेळी समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल या वेळी उपस्थित होते. शासनाची प्रतिमा शासकीय वसतिगृहांच्या माध्यमातून उंचाविण्याची जबाबदारी गृहपालांची आहे, असे पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त एम. एम. आत्राम यांनी या वेळी सांगितले. शासकीय वसतिगृहांची विश्वासार्हता, जनमानसातील प्रतिमा, विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहाप्रती जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. याची दक्षता गृहपालांनी कटाक्षाने घेतली पाहिजे.
भविष्यात वसतिगृहांच्या प्रवेशप्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे यासाठी इ-शिष्यवृत्तीच्या धर्तीवर इ-अ‍ॅडमिशनप्रणाली पुढील वर्षांपासून राबविण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. शासकीय वसतिगृहांतील प्रत्येक विद्यार्थ्यांस संगणक प्रशिक्षण देण्यात येत असून यापासून कोणाताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही आत्राम यांनी केले.
या वेळी नाशिक विभागात समाजकल्याण खात्याने केलेल्या कामाचा व योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा राजेंद्र कलाल यांनी सादर केला. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त वासुदेव पाटील यांनी केले.
दरम्यान समाजकार्य महाविद्यालय व समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांनी समन्वय व सहकार्यातून नवीन उपक्रम व योजना राबविल्यास निश्चितच यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन आत्राम यांनी नाशिक विभागाच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या बैठकीत केले.
बैठकीस समाजकल्याणच्या नाशिक विभागातील पाचही जिल्ह्य़ांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. समाजकल्याण विभागाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयांनी पुढे यावे असे आत्राम यांनी सांगितले.