कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या गोविंदराव गुणे हिंदुस्थानी खयाल गायन स्पर्धा नाशिकच्या देवश्री नवघरे व अमृता मोगल या दोघींनी गाजवली.
या स्पर्धेत देवश्री नवघरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पाच हजार रूपये तसेच पं. जगन्नाथबुवा पुरोहित स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच जयपूर घराण्यातील गान वैशिष्टय़ांची विशेष जोपासना करून स्पर्धेत गायन  केल्याबद्दल अमृता मोगल यांना पं. श्रृति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते उस्ताद अझिझुद्दीन खाँ यांच्या स्मरणार्थ विशेष पारितोषिक पाच हजार रूपये व प्रशस्तीपत्रक या स्वरूपात देण्यात आले. देवश्री व अमृता या दोघी जयपूर घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध गायिका मंजिरी असनारे-केळकर यांच्या शिष्या असून अनेक वर्ष त्यांच्याकडून घराणेदार गायकीचे प्रशिक्षण घेत आहेत. यंदाचे या स्पर्धेचे २२ वे वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. यंदाचे हे दोन्ही मानाचे पुरस्कार नाशिकच्या उदयोन्मुख युवा कलाकारांनी मिळवून शहराचे नाव उंचावले आहे.