फेब्रुवारीत गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना तालुक्यात अनेक त्रुटी राहिल्या असून भरपाईपासून वंचितांना प्रशासकीय पातळीवरून आजवर केवळ आश्वासनेच देण्यात आल्याची तक्रार करीत ग्रामशक्ती संघटनेतर्फे सोमवारी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तालुक्यात डाळिंब, द्राक्ष, कांदे, मका या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीच्या पंचनाम्यात गोंधळ झाल्याच्या तक्रारी आहेत. नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी जाऊ लागले. महसूल अधिकाऱ्यांनी वंचितांना मदत देण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यास दीड महिना उलटल्यावरही वंचितांना भरपाई मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची या लोकांची भावना झाली असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांंनी व्यक्त केली.
पीकनिहाय ५० टक्क्याखालील आणि त्यावरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना भरपाई दिली गेली तरी तालुक्यातील बहुसंख्य नुकसानग्रस्तांचे पंचनामेच झालेले नाहीत. प्रत्यक्षात पंचनामे होऊनही अनेकांची नावे वगळण्यात आली. कोरडवाहू शेतकऱ्यांना फळबागायत पिकांची भरपाई दिली गेली. तर, खऱ्या लाभार्थ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. काही जणांना नुकसानीपेक्षा अधिक मदत दिली गेली. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर देवरे, हिरामण कचवे, रमेश मोरे, कारभारी शेवाळे, सचिन बच्छाव, समाधान हिरे पप्पू पाटील, मुकेश खेडकर, सुनील भामरे, सुनील देवेरे आदींचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
गारपीटग्रस्तांना भरपाईसाठी ग्रामशक्ती संघटनेचे आंदोलन
फेब्रुवारीत गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना तालुक्यात अनेक त्रुटी राहिल्या असून भरपाईपासून वंचितांना प्रशासकीय पातळीवरून आजवर केवळ आश्वासनेच देण्यात आल्याची तक्रार करीत
First published on: 05-08-2014 at 08:37 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gramasakti union movement