कराड अर्बन बँक सामाजिक बांधिलकीतून राबवत असलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कराडनंतर आता लवकरच कोल्हापूर शहरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती बँकेचे संचालक व बँकेचे वाचक चळवळ समन्वय समितीचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी दिली.
बँकेने कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या सहकार्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना कराड परिसरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत कराड अर्बन बँकेने शहर व परिसरात एकूण १३ मोफत वाचनालय केंद्रे केली आहेत. त्याचे अनेक वाचक लाभ घेत आहेत. हे केंद्र कोल्हापूर येथे सुरू होणार असून, त्यासाठी बँकेने सहा पेटय़ा उपलब्ध केल्या आहेत. या योजनेसाठी कोल्हापूर येथील उद्योगपती मोहन मुरळेकर यांनी या उपक्रमासाठी एक लाखाची देणगी दिली आहे. त्यातून पाच पेटय़ा व बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ केशव जोशी यांनी एक पेटी पुरस्कृत केली आहे. अशा एकूण सहा पेटय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व पेटय़ांची जबाबदारी कराड अर्बन बँकेने स्वीकारली आहे. या ग्रंथपेटय़ा कोल्हापूर शहरातील विविध भागांत वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पेटय़ांमधील ग्रंथसंपदा वाचकांना मोफत वाचनासाठी उपलब्ध होणार असून, त्यासाठी अनामत म्हणून ५०० रुपये घेतले जाणार आहेत.
 एका ठिकाणी किमान चार महिने कालावधीसाठी एक पेटी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर वाचकांच्या मागणीनुसार ही पेटी फिरवली जाणार आहे.