राज्याने २०१० पासून सांस्कृतिक धोरणाचा स्वीकार केला असून, या धोरणाचा एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने शहरातील शिवाजी नाटय़मंदिर आवारात २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज्, शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी संजय कोतकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, प्रा. डॉ. सुनंदा पाटील, उज्ज्वल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नाटय़मंदिरच्या आवारात ग्रंथ विक्रीसाठी दालन उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक विषयांवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असल्याने औचित्य साधत नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यप्रेमींसाठी हा योग जुळवून आणला आहे. या निमित्ताने सकस साहित्य, नवीन माहिती व विज्ञान तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके प्रकाशकांनी या ग्रंथोत्सवात वाचकांना उपलब्ध करून द्यावीत. शाळा महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय, खासगी संस्थांमध्ये विविध स्तरावर स्पर्धाचे आयोजन करावे, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मान्यवर साहित्यिक, लेखक यांच्या मुलाखती, परिसंवाद आयोजित करण्यात यावेत, विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळेचे आयोजन करावे, अशा विविध सूचना बकोरीया यांनी दिल्या. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने खान्देशातील विविध प्रकाशन संस्था व वितरकांना ग्रंथ विक्रीची मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली असून, ग्रंथोत्सवात राज्य साहित्य संस्कृती मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, ग्रंथाली, अनुभव-अक्षरधन, साकेत प्रकाशन यासारख्या नामांकित संस्थांसोबत ज्या स्थानिक प्रकाशन व वितरकांना आपली दालने या ग्रंथोत्सवात उभारायची आहेत त्यांनी ०२५६४-२१००१५ किंवा ९८२२ २१७ २१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा ग्रंथोत्सव आयोजन समितीचे सदस्य सचिव रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2013 रोजी प्रकाशित
नंदुरबारमध्ये ‘ग्रंथोत्सव’
राज्याने २०१० पासून सांस्कृतिक धोरणाचा स्वीकार केला असून, या धोरणाचा एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने शहरातील शिवाजी नाटय़मंदिर आवारात २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.
First published on: 09-02-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Granthotsav in nandurbar