सर्वाना समान वागणूक, या न्यायानुसार शिवसेनाप्रमुखांनी सर्वावर प्रेम केले. कोणताही भेदभाव न करता माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्याकडून मिळणारी समान वागणूक हा एक वेगळाच अनुभव. त्यामुळेच तर सामान्य शिवसैनिकापासून संपर्कप्रमुख असा प्रवास आपण करू शकलो..
वयाच्या १७व्या वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले मनमाड येथील अल्ताफ खान यांची ही भावना शिवसैनिकांसाठी नवीन नाही. सध्या धुळे लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अल्ताफ खान यांच्या घरी आठवडय़ापासून अन्न शिजलेले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी, प्रखर वक्तृत्वाने प्रभावित होऊन अल्ताफ यांनी शिवसेनेचे काम सुरू केले. स्थानिक पातळीवरील शाखाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी समाजातील उपेक्षितांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे नांदगाव तालुक्यासारख्या ग्रामीण भागात आपणास भगवे वादळ निर्माण करता आल्याचे ते म्हणतात.
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाप्रसंगी शिवसेनाप्रमुखांची प्रथमच भेट झाली. अनंत कान्हेरे मैदानावर झालेली शिवसेनाप्रमुखांची भेट नवी उभारी देणारी ठरली. या भेटीनंतर पुन्हा नव्या जोमाने शिवसेनेच्या कामास सुरुवात केली.
शिवसेनाप्रमुखांच्या विश्वासामुळेच शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख ते संपर्कप्रमुख असा प्रवास यशस्वीपणे केला. अधिवेशनानंतर शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वेळा मुंबईला जाणे झाले.
‘मातोश्री’वरील शिवसेनाप्रमुखांची भेट अंगी व मनी नवचैतन्य निर्माण करत असे. जाहीर सभांमध्येही साहेब ‘हा माझा अल्ताफ’ असा उल्लेख करीत. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही आपण झटत राहू, अशी भावना अल्ताफ खान यांनी व्यक्त केली.