शहरातील महावीर कृपा एज्युकेशनल, कल्चरल स्पोर्टस् अकादमीतर्फे ओसवाल पंचायती वाडय़ात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत १४व्या कपूरचंद कोटेचा स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
रोज सायंकाळी ६.१५ वाजता व्याख्यान होणार आहे. यंदा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अभिनेते शरद पोंक्षे ‘भारत काल, आज उद्या’ या विषयावर गुंफणार आहेत. पोंक्षे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी व मालिका या माध्यमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
१२ जानेवारी रोजी मेंटल हेल्थ आणि निरोगी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ‘मानसशास्त्र आणि इतिहास’ यांचा समन्वय साधणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून डॉ. नाडकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले जातील. व्याख्यानमालेचा समारोप १३ जानेवारी रोजी व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे करणार आहेत. मेहेत्रे यावेळी ‘हास्य कॉर्नर’ सादर करतील. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २००० मध्ये त्यांना उत्कृष्ट व्यंगचित्रकलेसाठी शं. वा. किलरेस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्य, कलेचा आस्वाद देणाऱ्या व्याख्यानमालेस रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा मोनिका कोटेचा व आयोजकांनी केले आहे.