लग्नाच्या आदल्या दिवशीच पोलीस शिपाई असलेल्या नवरदेवाने घरातून पलायन केल्याने वधूपक्षाकडील मंडळींना पोलीस ठाण्यात धाव घेऊन ठिय्या मारावा लागला.
नरेंद्र मारूती बाबर (वय २५, रा. शहर पोलीस मुख्यालय, सोलापूर) असे गायब झालेल्या पोलीस नवरदेवाचे नाव आहे. शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या नरेंद्र बाबर याचा विवाह सोहळा बार्शी येथे होणार होता. दोन्ही पक्षांकडील घरात लगीनघाई सुरू होती. वधूकडे विवाह सोहळा होणार असल्यामुळे वधूकडील मंडळी वरास बोलावण्यास आली.परंतु सकाळीच वर घरातून गायब झाला होता. केशरचना करून लग्नाचा पोशाख आणतो असे म्हणून  नरेंद्र घरातून पडला असता सायंकाळ उलटली तरी परतला नाही. त्यामुळे वधूकडील मंडळी चिंतातूर झाली. सगळीकडे शोधाशोध घेऊनदेखील वर सापडला नाही. त्यामुळे अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वधूपक्षाकडील मंडळींनी थेट पोलीस ठाणे गाठले.
वर नरेंद्रचे वडील मारूती बाबर हेदेखील पोलीस खात्यात सेवेत आहेत.त्यांनी रात्री उशिरा जेलरोड पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार नोंदविली. तर इकडे, वधूकडील मंडळींनी सोलापुरात येऊन वरपक्षाला जाब विचारला  व नंतर या मंडळींनी जेलरोड पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या मारला. नरेंद्र व त्याच्या घरच्या मंडळींनी आपली फसवणूक केल्याची त्यांची तक्रार आहे.