गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या मराठी नववर्षांत महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे व छेडछाडमुक्त नाशिक करणे, यांसह इतर अनेक मागण्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
आगामी वर्ष हे महिलांवरील ‘अत्याचारमुक्त वर्ष’ असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षांत सोनसाखळी चोरीच्या नित्य प्रकारांसह नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार, सातपूरमधील महिला आत्महत्या अशा घटनांमुळे शहर व जिल्ह्यातील महिलांची सुरक्षितता हा विषय अधिकच चर्चेला आला. या पाश्र्वभूमीवर महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी युवतींना पोलिसांमार्फत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जावे, छेडछाडविरोधी घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गस्त वाढविणे, महिलांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
नववर्षांची गुढी उभारताना आपण युवतींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना समाजात वावरताना निर्भय वाटेल असे वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पोलीस आणि युवती यांच्यातील दुवा बनून सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासनही या वेळी अमृता पवार, आरती निखाडे, किशोरी खैरनार, प्रतीक्षा जाधव आदींनी दिले.