प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम
पंधरा दिवसांच्या कालावधीत देशाच्या विविध भागांत आरामदायी बसगाडय़ांना अपघात होण्याच्या काही घटना घडल्याने मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली. या पाश्र्वभूमीवर नाशिक विभागात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरुवात केली असून, अपघात झाल्यास जीवितहानी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात राज्य मार्ग परिवहन महामंडळासह सर्व बसमालक व नियंत्रकांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक निरीक्षकांसह १२ बस नियंत्रक उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी या बैठकीत बस नियंत्रकांना अनेक सूचना केल्या. बसमधील सर्व संकटकालीन खिडक्यांच्या ठिकाणी मोठय़ा लाल अक्षरात ‘इमर्जन्सी एक्झिट’ (आपत्कालीन मार्ग) असे लिहिलेले असावे, आपत्कालीन खिडकीच्या जवळ हातोडा ठेवण्यात यावा, बसमधील चालक कक्षात आणि बसच्या मागच्या बाजूला अग्निशामक उपकरणे बसविलेली असावीत आणि याचा वापर करण्याबाबत प्रवाशांना माहिती द्यावी, प्रवास सुरू होण्यापूर्वी वाहनचालक व सहकाऱ्याने सर्व प्रवाशांना बसमधील आपत्कालीन खिडकी, दरवाजा याविषयी तसेच आपत्कालीन स्थितीत बाहेर कसे पडावे याबाबतची माहिती देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
बसमधील प्रवाशांनी आपत्कालीन स्थितीमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत दर दोन तासांनी सुरक्षिततेच्या सूचना व्हिडीओद्वारे दाखवाव्यात, आपत्कालीन खिडकीजवळ बसणाऱ्या प्रवाशांना आपत्कालीन स्थितीमध्ये काय करावे याबाबतची माहिती द्यावी, बसमध्ये आवश्यक औषधांची प्रथमोपचार पेटी ठेवावी, प्रवाशांच्या सामानात ज्वलनशील पदार्थ नसल्याची तपासणी करावी, वाहनचालकाने निश्चित मर्यादेपेक्षा जादा वेगाने वाहन चालवू नये, लांब पल्ल्याच्या वाहनांवर किमान दोन चालक असावेत, चालक व सहकाऱ्याने अपघात घडल्यानंतर पळून न जाता प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, विनाविलंब जवळच्या पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती द्यावी, मार्ग निश्चित असल्यास पोलीस, रुग्णवाहिका सेवा, रुग्णालय यांची माहिती व भ्रमणध्वनी क्रमांक यांची यादी बसमध्ये किमान दोन ठिकाणी ठेवावी, असे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. सर्व उपस्थितांनी या निर्देशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance for driveing safely for avoid bus accidents
First published on: 20-11-2013 at 08:54 IST