श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या पालख्यांनी साईनगरी दुमदुमून गेली.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुमारे ५० पालख्यांनी शिर्डीत हजेरी लावली. पुणे येथून आलेल्या पालखीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या पालखीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पालखीसोबत सुमारे ३ हजार पदयात्री आहेत. तसेच नादब्रह्म या १०० ढोलपथकाच्या आवाजाने शिर्डी दणाणून गेली. खंडोबा मंदिरात पालखीचे स्वागत संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. पालखी समितीने देणगीदाखल समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या प्रतिमेचे, श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य तथा कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी पोथी, उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत माने व मंदिरप्रमुख रामराव शेळके यांनी साईप्रतिमा तर संस्थानचे पुरोहित उपेंद्र पाठक यांनी वीणा घेऊन आपला सहभाग नोंदवला. श्रींच्या प्रतिमेची व पोथीची मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या ग्रंथपारायणाचा शुभारंभ करण्यात आला. किशोर मोरे यांनी प्रथम अध्याय व डॉ.यशवंत माने यांनी दुसरा अध्याय, साईभक्त कार्तिकी पासरकर, संदेश खोत व प्रकाश सोनसळे यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
उत्सवाच्या निमित्ताने किशोर व मंजुश्री मोरे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प.गंगाधर नरहर व्यासबुवा यांचे कीर्तन झाले. रात्री ७.३० वाजता चंचल जामदार (इंदौर) यांचा साईगीत सच्चरित भजनरूपात हा कार्यक्रम समाधी मंदिराशेजारील स्टेजवर झाला. रात्री ९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई केली.
उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणाची समाप्ती होणार असून समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. सायंकाळी ४ वाजता ह.भ.प.गंगाधर नरहर व्यासबुवा यांचे कीर्तन होणार असून सायंकाळी ७ वाजता धूपारती, तर रात्री ७.३० ते १० या वेळेत विनोद नाखवा, ठाणे यांचा‘मी मुंबईचा हाय कोळी हा कार्यक्रम समाधी मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहे. रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत समाधी मंदिरात विविध कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने हैदराबाद येथील साईभक्त जे. आर. राव यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ९८७.४०० ग्रॅम वजनाच्या २४ लाख २६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन समया श्रींच्या चरणी अर्पण केल्या. तर श्री साई प्रसादालयामध्ये के. पद्मनी चित्तोर, पार्थसारथी नारायण थोरात शिर्डी, के. गुणास शेखर चित्तोर, प्रयागा सिंग-आयुष सिंग गरवा व नटराजन नंदगोपाल चेन्नई या साईभक्तांच्या देणगीतून मोफत प्रसाद भोजन देण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jul 2013 रोजी प्रकाशित
गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात; पालख्यांनी दुमदुमली साईनगरी
श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या पालख्यांनी साईनगरी दुमदुमून गेली.

First published on: 22-07-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru purnima starts in enthusiasm in shirdi