सिमेंटची जंगले उभारण्याच्या हव्यासातून शहरातील नाल्यांची गळचेपी करण्याच्या प्रकाराला उधाण आले आहे. पूररेषेमध्ये बांधकामे केली जात असल्याने नाल्यांचा मूळचा प्रवाह संकुचित झाला असून शहराला पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. तरीही आर्थिक हव्यासातून बांधकामाचे विकसक व महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमतातून शहराला धोका पोहोचविणारी बांधकामे बोकाळत चालली आहेत. नाल्याकाठी उंच भिंती उभारल्या गेल्याने एका बाजूची सुरक्षा होणार असली तरी विरुद्ध दिशेला महापुराचा जबर तडाखा बसणार आहे. या प्रकाराबद्दल राजकीय पक्ष, पर्यावरण अभ्यासक यांनी तक्रारी करूनही याकडे सहेतुक दुर्लक्ष केले जात आहे.     
कोल्हापूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी बांधकाम क्षेत्रही झपाटय़ाने विस्तारत आहे. मात्र बांधकाम करताना नियमावलीचा विधिनिषेध न पाळता मनमानी पद्धतीने ती केली जात आहेत. महापालिकेने ठरविलेल्या रेड झोनमध्ये भराव टाकण्याचे काम उघडपणे होत आहे. जयंती नाल्याच्या बाजूला तर लांबलचक भिंत बांधली गेली आहे. यामुळे पूर्वी पंधरा-वीस फुटांपर्यंत विस्तार असलेला नाला अलीकडे एखाद्या गटारीप्रमाणे वाहात आहे. हे चित्र शहराच्या अनेक भागांमध्ये दिसत आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इमारतीजवळील हॉटेल मनोरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आहे. यल्लमा ओढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढय़ाचे रूपांतर आता एखाद्या गटारीसारखे झाले आहे. असेच चित्र बसंत-बहार चित्रमंदिराजवळ आहे. तेथे तर बांधकामाच्या खालून ओढा वळविण्याचा प्रकार घडला आहे. वादग्रस्त ठरलेल्या आयआरबी-आयर्न हॉस्पिटॅलिटीच्या बांधकामाचा विषय तर सातत्याने गाजतो आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या अतिभव्य हॉटेलच्या बांधकामाच्या मध्यातून एक नाला वाहात होता. बांधकामाच्या सोयीसाठी तो भलत्याच बाजूने वळविला गेला. परिणामी स्वामी समर्थनगर भागात भररस्त्यावर नाल्याचे पाणी वाहू लागले. या पाण्यात पाच वर्षांचा एक मुलगा वाहून जाण्याचा प्रकार घडला होता. सुदैवाने बाजूच्या लोकांनी त्याला वाचविले. असा जीवघेणा प्रकार होऊनही जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन अद्यापही सुस्त आहे.    
जयंती, दुधाळी, कसबा बावडा या नाल्यांचे मूळचे चित्र गायब झाले आहे. भर शहरात सिमेंटची जंगले उभे करण्याच्या नादात निसर्गावर अतिक्रमण करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये वैयक्तिक बांधकाम करणाऱ्यांचा जसा समावेश आहे तसाच तो विकसकांचा आहे. जयंतीनाला शहराच्या मध्यातून वाहतो आहे. या नाल्याच्या जवळच मोठमोठी बांधकामे नियमाची पायमल्ली करून उभी राहात आहेत. त्याबद्दल सातत्याने तक्रारीही करण्यात आल्या. त्यावर नाल्याकाठी बांधकामाची पडदी उभी करून जुजबी कारवाई करण्यात आली. मात्र ही तकलादू उपाययोजना नागरिकांच्या जिवावर बेतणारी आहे. पूररेषेचे उल्लंघन करून बांधकामांचा विस्तार करण्यात आला आहे.     
सन २००५मध्ये जामदार क्लब, पंचगंगा इस्पितळ या परिसरात पाणी आले होते. यंदा महापुराची तशीच परिस्थिती उद्भवली तर त्याच्याही पुढे पाणी जाऊन हाहाकार माजण्याची शक्यता आहे. तेव्हा काही भागात तळमजल्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये महापुराचे पाणी घुसले होते. आता नाल्याभोवती भराव टाकण्याचा प्रकार सुरू झाल्याने एका बाजूचे पाणी विस्तारण्याचे थांबून ते विरुद्ध दिशेला अधिक प्रमाणात पसरणार आहे. परिणामी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरातही पाणी घुसण्याचा धोका पर्यावरण अभ्यासकांना जाणवत आहे. रेड झोनमधील बांधकामाबाबत ओरड सुरू झाल्यावर महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम सुरू केले आहे. आवश्यक तर फौजदारी करण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला आहे. मात्र तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे. अगोदरच महापुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन बांधकाम क्षेत्रात मनमानी करणाऱ्या बडय़ा धेंडांना रोखले असते तर प्रशासनावर हीसुद्धा वेळ आली नसती. किमान याउपर प्रशासनाने सजग राहून नाल्याकाठी बांधकामाची बेबंदशाही करणाऱ्यांना कठोरपणे रोखण्याची गरज आहे.