अल्फा जिमचा हबिब सय्यद याने जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व सातपूर येथील कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘कामगार श्री २०१२’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेता होण्याचा मान मिळविला. जिल्ह्य़ातील ६० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक सलीम शेख व महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष गोविंद काळे, नारायण निकम, धनंजय काळे, ज्युनिअर मिस्टर इंडिया योगेश निकम, ज्युनिअर महाराष्ट्र श्री हितेश निकम हे उपस्थित होते. प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीने रंगलेल्या या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंनी संगीताच्या तालावर शरीराच्या सौष्ठवाचे प्रदर्शन केले. ५५ किलो वजनी गटात नाशिकच्या हेल्थ अ‍ॅण्ड मोअरचा नितीन बागूल, ६० किलोमध्ये इगतपुरीच्या ऑलिम्पिया जिमखान्याचा पवन पवार ६५ किलोमध्ये मालेगावच्या मास्टर फिटनेसचा अब्दुल्ला, ७० किलोमध्ये अल्फा जिमचा हबिब सय्यद, ७० किलोवरील गटात हेल्थ अ‍ॅण्ड मोअरचा पुंडलिक सद्गीर हे विजेते ठरले. सर्व गटविजेत्यांमध्ये ‘कामगार श्री’ किताबाकरिता अंतिम लढत झाली. सय्यद, सद्गीर आणि पवार यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अखेर पंचांचा  कौल  सय्यद याच्या बाजूने गेला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्लोबल प्रॉपर्टीज्चे संचालक विलास गायकवाड, सलीम शेख, राजेंद्र सातपूरकर, हेमंत जाधव आदींच्या हस्ते पार पडला.
गुणलेखक म्हणून किशोर सरोदे तर पंच म्हणून नारायण निकम, रवींद्र गायकवाड, नीलेश संधान, हेमंत साळवे यांनी काम पाहिले.