बारमधील ‘त्या’ टेबलवर बसल्याने झाला आरटीओ एजंटचा खून
चिखली येथील आरटीओ एजंट बाळासाहेब मिसाळ (वय ४५) यांचा गैरसमजुतीतून हकनाक बळी गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाचा सूड घेण्यासाठी हल्लेखोरांनी सोमवारी रात्री मिसाळ यांच्या डोक्यात गोळी झाडली, पण ज्यांचा खून करायचा होता ते हे नव्हतेच.. ज्याला मारायचे होते तो बियरबारच्या विशिष्ट टेबलवर बसायचा, नेमक्या त्याच टेबलवर सोमवारी रात्री मिसाळ बसले, शिवाय मिसाळ यांची शरीरयष्टी त्याच्यासारखीच होती. त्यामुळे गैरसमजुतीतून मिसाळ यांचाच खून झाला.
या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी संजय बिराप्पा वाघमोडे (वय २०, रा. मोहनगर, चिंचवड) या हल्लेखोराला अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने वाघमोडे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडय़ाचा प्रयत्न, मारहाण असे तीन गुन्हे दाखल आहेत. मिसाळ यांच्यावर सोमवारी रात्री चिखली येथील आरटीओ कार्यालयाजवळ हल्ला झाला होता. डोक्यात गोळी झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एकाच्या भावाचा पाच वर्षांपूर्वी खून झाला होता. त्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी एका तरुणाला मारण्याचा कट रचला होता. तो तरुण आणि मिसाळ यांच्या शरीरयष्टीत साधम्र्य होते. तो तरुण नेहमी आरटीओ कार्यालयाजवळील एका बारमध्ये दारू प्यायचा. त्यासाठी तो विशिष्ट टेबलवर बसायचा. त्यामुळे हल्लोखोरांनी या ठिकाणीच त्याला गोळ्या घालून मारण्याचा कट रचला होता. मात्र, सोमवारी त्या टेबलवर नेमके मिसाळ बसले. त्यांची शरीरयष्टीही त्या तरुणासारखीच होती. मिसाळ रात्री नऊच्या सुमारास या टेबलवरून उठून बाहेर चालले होते, त्या वेळी हल्लोखोरांनी पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात गोळी घातली. ती त्यांच्या डोळ्याजवळ येऊन अडकली होती. शस्त्रक्रिया करून ही गोळी काढत असताना मिसाळ यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाकडून सुरू होता. त्यांनी वाघमोडे याला अटक केल्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. फरार तीन आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली
आहेत.