रेल्वेतून पडल्यावर वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये जखमी अवस्थेत घेऊन नातेवाईक आणि मित्र धावत होते. डोक्याला झालेल्या जखमेमुळे तो बेशुद्ध पडला होता. भाभा, केईएम आणि शीवच्या पालिका इस्पितळामध्ये जागा नाही, उपचाराची साधने नाहीत अशा अवस्थेमध्ये त्याला तब्बल आठ तास काढावे लागले. पण कसेही करून त्याला वाचवायचेच, असा त्याच्या मित्रांचा निर्धार होता. म्हणूनच खरेतर तौफेल त्या दिवशी वाचू शकला. रेल्वेमधून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रुग्णास पालिका इस्पितळातूनच कसे नाचवले जाते याचे उदाहरण म्हणजे तौफेलचे ते आठ तास!
तौफेल खान हा अॅन्टॉप हिलमधील तरूण शिवणकाम करतो. सोमवारी सांताक्रूझ येथे काम करून तो मित्रांसमवेत परत येत होता. सायंकाळी सव्वाचार वाजता चर्चगेटकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीला असलेल्या गर्दीमुळे तौफेल बाहेर उभा होता. अचानक त्याचा हात सुटला आणि तो गाडीतून खाली पडला. रक्तबंबाळ अवस्थेतील तौफेलला त्याच्या मित्रांनी तातडीने भाभा इस्पितळात नेले. तेथे त्याच्या डोक्यावर झालेल्या जखमेवर किरकोळ उपचार करत ‘येथे सीटीस्कॅनची आणि शस्त्रक्रियेची व्यवस्था नाही,’ असे सांगत भाभामधून त्याला तातडीने केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले.
‘केईएम’मध्ये त्याला साधारणत: सात वाजण्याच्या सुमारास आणण्यात आले. तेथे त्याचे सीटीस्कॅन झाल्यावर त्याला शस्त्रक्रियेसाठी शीव येथील पालिका इस्पितळात रात्री साडेदहा वाजता पाठविण्यात आले. मात्र त्याचवेळी कुर्ला येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींना आणण्यात आले होते. तेथील अपघात विभागात एकही कॉट रिकामा नव्हती. केईएममधून त्याला नेमके कोणत्या कारणासाठी पाठविण्यात आले होते, हे मात्र तौफेलच्या सोबत आलेल्या कोणालाही माहित नव्हते. रात्री बाराच्या सुमारासही तौफेल एका स्ट्रेचरवर शीव इस्पितळाच्या आवारात तळमळत होता. त्याची आई, मित्र आणि नातेवाईक तेथे असलेल्या प्रत्येकाला इस्पितळात दाखल करून घेण्यासाठी डॉक्टरांना विनंती करायला सांगत होते. पण डॉक्टर जागा नाही, असेच कारण देत होते. एका डॉक्टरने तर त्याला परत केईएमला न्या, त्यांनी पाठवलेच कसे त्याला इकडे?, असा सवाल करीत तौफेलच्या नातेवाईकांनाच धारेवर धरले. केईएम इस्पितळात परत नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. अखेर त्याच्या मित्रांनीच पुढाकार घेतला आणि खासगी रुग्णवाहिकेमधून त्याला वांद्रे येथील शांतीनाथ नर्सिंग होममधे नेले. तेथे त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आणि गुरुवारी सायंकाळी त्याची तब्येत सुधारत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तौफेल गाडीतून पडल्यावर रेल्वे पोलिसांची मदत घेत त्याला इस्पितळात नेले असते तर तो वाचू शकला नसता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
मित्रांमुळेच ‘तो’ बचावला..
रेल्वेतून पडल्यावर वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये जखमी अवस्थेत घेऊन नातेवाईक आणि मित्र धावत होते. डोक्याला झालेल्या जखमेमुळे तो बेशुद्ध पडला होता. भाभा, केईएम आणि शीवच्या पालिका इस्पितळामध्ये जागा नाही, उपचाराची साधने नाहीत अशा अवस्थेमध्ये त्याला तब्बल आठ तास काढावे लागले.
First published on: 30-03-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He survived due to friends