पनवेल शहरात आरोग्याची तपासणी करणाऱ्या एका बोगस आरोग्य प्रयोगशाळेचा पर्दाफाश झाल्यानंतर आता पोलिसांनी पनवेलकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात शहरातील निदान पॅथालॉजिकल या प्रयोगशाळेत अभिजीत हावळे (वय ५०) या बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या एका डॉक्टरच्या नावाने हावळे व्यवसाय करत होता. ज्या डॉक्टराचे नावाने अभिजीत धंदा करत होता, त्यांनीच अभिजीतची ही बोगस प्रयोगशाळा उघडकीस आणली. त्यानंतर पोलिसांनी अशा प्रयोगशाळांचा शोध सुरू केला असून सर्व नियम धाब्यावर बसवून मेडिकल रिपोर्ट देणाऱ्या ५० हून अधिक प्रयोगशाळा पनवेल परिसरात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, पनवेलचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांना हा सर्व प्रकार जीवघेणा असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोग्याची तपासणी करणाऱ्या लॅबविषयी सतर्क राहा, असे आवाहन करत या आरोग्याच्या धंद्याविषयी जगजागरण सुरू केले आहे. अभिजीत गेल्या ५ वर्षांपासून नांदेडचे डॉ. प्रमोद राठोड यांची स्वाक्षरी करून तपासणी अहवाल देऊन रुग्णांची फसवणूक करत होता. या प्रकरणी अटकेत असलेले अभिजीत हावळे सध्या तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. २५ जानेवारीला शहरातील निदान पॅथालॉजिकलमध्ये स्वत डॉ. प्रमोद राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट स्वाक्षरी करताना हावळेंना पाहिले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेतली. अभिजीतने (वय ५०) डीएमएलटीचे शिक्षण घेतल्याचा दावा पोलिसांसमोर केला आहे. २००९ पासून हावळे शहरात लॅब चालवत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू रायकर यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या ५ वर्षांत हावळेने २५ हजार रुग्णांचे परीक्षण करून त्यांना तपासणीचे अहवाल दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यातून हावळेला सुमारे २५ लाख रुपयांची कमाई झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लॅबमधून रुग्णांना चुकीचा अहवाल दिल्याची नोंद कोणत्याच प्रशासनाकडे नाही. रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांनी सुचविलेल्या लॅबमध्ये जातात. पेण येथील वंदे मातरम या संस्थेमध्ये हावळे याने प्रशिक्षण घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस याची खात्री करत आहेत. हावळेने पनवेल येथील न्यायालयात न्यायालयीन कोठडीतून मुक्तता होण्यासाठी जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. शहरात वाढत्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेला गैरप्रकार यानिमित्ताने उघड झाला आहे. पनवेल नगरपालिकेच्या परिसरात चहाची बेकायदा टपरी उभारणे अवघड आहे, मात्र लॅब उघडणे त्याहून सोपे झाले आहे, असा दावा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला. शहरात ७० वैद्यकीय प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी हावळे याच्यासारख्या ५० हून अधिक प्रयोगशाळा अजूनही बेकायदा सुरू आहेत. काही ठिकाणी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच अशा बेकायदा चालणाऱ्या प्रयोगशाळांची शिफारस करतात. ही जिवावर बेतणारी बाब आहे. नगरपालिका क्षेत्रात प्रयोगशाळेची नोंदणी होत नाही. त्यामुळे अशा प्रयोगशाळा फोफावल्या आहेत, असे मत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health business rises in panvel
First published on: 15-02-2014 at 12:57 IST