एका शाळेजवळ बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने सोमवारी सकाळी इमामवाडा पोलिसांची धावपळ उडवून दिली होती. बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतर ही अफवाच असल्याचे सिद्ध झाले.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणखणला. सिरसपेठेतील महेश कॉलनीत असलेल्या आनंद विद्यालयाजवळ बॉम्ब ठेवला असल्याचे सांगून बोलणाऱ्याने दूरध्वनी बंद केला. नियंत्रण कक्षाने तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच इमामवाडा पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्यासह इमामवाडा पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक शाळेजवळ पोहोचले. या पथकाने व पोलिसांनी शोध घेतला. मात्र, संशयित काहीच आढळले नाही.
उड्डाण पुलावरून उडी
घेऊन तरुणीची आत्महत्या
पाचपावली उड्डाण पुलावरून उडी घेऊन एका तरुणीने आत्महत्या केली. रविवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास पाचपावलीमधील बारसेनगरात ही घटना घडली. पूनम रवि समुद्रे (रा. पाचपावली ठक्करग्राम) हे तिचे नाव आहे. रात्री तिने पुलावरून उडी घेतल्याने ती खाली पडली. हे दिसताच नागरिक धावले. तिला भटनागर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटले
दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना सोमवारी पहाटे पंचशील चौकातील पारधी पेट्रोल पंपावर घडली. अशोक नीळकंठ रामटेके (रा. भगवाननगर) हा रात्री कामावर होता. पहाटे दोघेजण अ‍ॅक्टिव्हावर (एमएच/३१/व्हीएस/७८४९) आले. दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून घेतल्यानंतर त्यांनी वाद केला. अशोकच्या खिशातील दोनशे रुपये काढून ते दोघे पळून गेले. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला.