बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे एकमेकांमध्ये इतके भिनले होते की, दोघांना अलग करणे कोणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची वाटचाल अन् अस्तित्व कसे राहणार, याकडे बहुतेकांचे लक्ष आहे. कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची आता खरी परीक्षा सुरू झाल्याचे मानले जाऊ लागले. उध्दव यांनीही शिवसेनाप्रमुख या उपाधीला नम्रपणे नकार देत व पक्षाची धुरा शिरावर घेत बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवतच आपले मार्गक्रमण राहणार असल्याचे स्पष्ट केले. याआधी बाळासाहेब आणि उध्दव यांना मानणाऱ्या सर्वापुढे आता एकच पर्याय उपलब्ध असल्याने पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांनी मनापासून उध्दव ठाकरे यांना स्वीकारल्याचे नाशिक येथील विभागीय मेळाव्यात प्रकर्षांने अधोरेखीत झाले.
साडे चार दशकांपासून अवघ्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख काळाच्या पडद्याआड गेल्याने पोरकेपणाची भावना निर्माण झालेल्या शिवसैनिकांना उध्दव यांनी ‘कुटुंबिय’ अशी साद घातली. शिवसैनिकांमध्येच आपण बाळासाहेब पाहात असल्याचे सांगून हे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे नाशिकमध्ये आजवर कित्येक मेळावे व जाहीर सभा झाल्या. त्यास लाखोंची गर्दी लोटली असेल. परंतु, त्या सर्वाच्या तुलनेत भावनिक ओलाव्याने ओथंबलेली ही भेट शिवसैनिकांसाठी जशी हृदयस्पर्शी ठरली, तशीच उध्दव ठाकरे यांच्यासाठीही. शिवसेनाप्रमुख नसल्याने शिवसैनिक सैरभैर होणार नाहीत, याची काळजी घेत शिवसैनिकांच्या दु:खावर या निमित्ताने फुंकर घालण्याचा प्रयत्न कार्याध्यक्षांनी केला.  बाळासाहेबांचे नांव वेगळे केल्यास शिवसेनेत काहीच राहणार नाही, याची जाणीव पक्षाच्या धुरिणांना आहे. त्याचा प्रत्ययही  मेळाव्यात आला. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारीत माहितीपट यावेळी दाखविला जात असताना त्यातील काही प्रसंग पाहून कित्येकांना अश्रू रोखणे अवघड गेले. हीच खरी शिवसेनेची शक्ती आहे, हे नेत्यांच्याही लक्षात आले.
राज्याचा दौरा सुरू करण्याआधीच हा दौरा राजकीय नसल्याचे उध्दव यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राजकीय देवघेवीचा या मेळाव्यात प्रश्नच नव्हता. तरीही केवळ आपल्या नेत्याला भेटण्याच्या ओढीने उत्तर महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित झाले होते. गर्दीमुळे ओसंडून वाहणाऱ्या सभागृहातील चैतन्य पाहून खुद्द उद्धव ठाकरेही चकीत झाले. त्यांचे आगमन झाल्यावर सर्वानी उभे राहून केलेला मानाचा मुजरा सभागृहातील वातावरणाचा नूर बदलून टाकण्यास कारणीभूत ठरला. शिवसेनाप्रमुख आपल्यातच असल्याची प्रत्येकाला उध्दव यांनी जाणीव करून दिली. शिवसेनाप्रमुख ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येक सभेत समोर उपस्थित शिवसैनिक हेच आपले टॉनिक असल्याचे सांगत, त्याच भाषेत कार्याध्यक्षांनीही सभागृहाला संबोधित करताच शिवसैनिक भारावले नसतील तरच नवल. बाळासाहेब आजारी होते, तेव्हाच  उद्धव यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्याचीही पाश्र्वभूमी या विधानास असल्याने शिवसैनिक अधिकच हळवे झाले.   आजवर शिवसेनाप्रमुखांनी आदेश द्यायचा आणि शिवसैनिकांनी तो अमलात आणायचा, हाच काय तो शिरस्ता. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानिमित्त दरवर्षी होणारी भेट ही राजकीय फटकेबाजीमुळे गाजायची. त्यातही रोखठोक झोडपण्याचा कार्यक्रम असायचा. त्यामुळे कोणावरही आरोप नाहीत, टीकास्त्र नाही. केवळ भावनाशीलता या मुद्यावर झालेली शिवसैनिक आणि शिवसेनेचे प्रमुख यांची ही भेट दोघांसाठीही महत्वपूर्ण ठरली. शिवसैनिकांना एकाच धाग्यात गुंफून ठेवण्यास या भेटीचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. कार्याध्यक्षांनी पक्षासाठी संपूर्ण जीवनभर कार्यरत राहण्याचे वचन दिले आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही तितक्याच तीव्रतेने शिवसैनिकांनीही दिली. यावरून उभयतांनी आता वास्तव लक्षात घेऊन आपली पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे दिसून आले.
उद्धव यांनी जानेवारीपासून राजकीय दौरा सुरू करणार असल्याचे सूचित केले आहे. तेव्हापासून त्यांच्यातील राजकीय कर्तृत्वाची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पक्षातंर्गत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. उत्तर महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकवर सध्या मनसेचा कब्जा आहे. गटतट, अंतर्गत राजकारण व हेव्या-दाव्यांमुळे शिवसेना गलितगात्र झाली असून कोणाचा कोणात पायपोस नाही. पक्ष बांधणीकडे आमदारांनी पूर्णपणे पाठ फिरविली आहे. शिवसेनेचे म्हणवून घेणारे हे आमदार सत्ताधारी पक्षांच्या दिग्गजांशी हातमिळवणी करून स्थानिक पातळीवर राजकारणात रममाण आहेत. दाभाडीचे आ. दादा भुसे हे त्याचे ठळक उदाहरण. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांनी ‘गिसाका’ नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कंपनीला मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचे म्हटले जाते. विधानसभा निवडणुकीत भुजबळांकडून मिळालेल्या सहकार्याची परतफेड निफाडचे आ. अनिल कदम यांच्याकडूनही होत असल्याची चर्चा आहे. प्रदीर्घ काळापासून आमदारकी भूषविणारे आणि वेगवेगळ्या मुद्यावरून पक्षालाच चुचकारणारे बबन घोलप यांची खात्री शिवसैनिक देऊ शकत नाहीत. आमदारकी व गेल्यावेळी महापौरपद हाती असूनही घोलप कुटुंबियांनी पक्षासाठी काय केले, हा शिवसैनिकांचा सवाल आहे. महापौरपदाच्या काळात हे कुटुंब एका बाजुला आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी दुसऱ्या बाजुला, अशा यादवीच्या प्रसंगांना पक्षास वारंवार तोंड द्यावे लागले. लोकप्रतिनिधींच्या कार्यशैलीमुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी कितीही हातपाय हलविले तरी फारसे काही निष्पन्न होऊ शकत नाही. मुंबईहून नाशिकच्या वाऱ्या करणाऱ्या आतापर्यंतच्या संपर्क नेत्यांचीही कार्यशैली वेगळी म्हणता येणार नाही. या व अशा अनेक प्रश्नांवर उत्तर शोधणे कार्याध्यक्षांना भाग आहे.