पाऊस अवर्षण, कोरडेठण्ण पडलेले जलस्त्रोत, भूगर्भातील अतिशय खोल गेलेली जलपातळी या सर्वाचा दृश्य परिणाम म्हणून संपूर्ण जिल्ह्य़ात पाणीयुध्द पेटले आहे. जिल्ह्य़ात जणू अघोषित पाणीबाणीच निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या अथक प्रयत्नानंतर दुष्काळ व पाणीटंचाईत क्रमांक एकवर असलेल्या शेजारच्या जालना जिल्ह्य़ातील पाणीटंचाई आटोक्यात येत असली तरी दुबळी राजकीय महत्त्वाकांक्षा व प्रशासकीय अनास्था यामुळे बुलढाणा जिल्हा पाणीबाणी असलेला राज्यातील एकमेव जिल्हा आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.
आतापर्यंत जिल्ह्य़ातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलढाणा व लोणार या शहरासह १४७ गावांना २५७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत टँकरची संख्या साडे तीनशेहून पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या उपाययोजना तोकडय़ा असून त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.
जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा पाचशे मिलीमीटर पाऊस कमी झाल्याने डिसेंबर २०१२ मध्येच जिल्ह्य़ातील पाच मध्यम व सर्वच लघु प्रकल्प कोरडे पडले होते. पाण्याचे स्त्रोत आटल्याने असंख्य गावे व शहराच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी झाल्या आहेत. एप्रिलचा शेवटचा आठवडा व मेच्या पहिल्या आठवडय़ात सूर्य प्रचंड आग ओकत आहे. त्यामुळे वाढते बाष्पीभवन होऊ लागले आहे. कोरडय़ा झालेल्या भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खोल गेली आहे. भूगर्भातील पाणी २५ फुटापेक्षा खाली गेले आहे. बहुतांश विहिरी, विंधन विहिरी व हातपंप आता कोरडे झाले आहेत. त्यामुळे दुष्काळ व उन्हाच्या दाहकतेसोबतच नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष नागरिकांना चार चार किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी आणून आपली गरज व तहान भागवावी लागत आहे. सर्वात भीषण पाणीटंचाई सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार व बुलढाणा शहरात निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत बुलढाणा शहराला पंचवीस दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ओरड झाल्यावर प्रशासनाने जलशुध्दीकरण केंद्रात पाणी टाकण्यासाठी दहा टँकर्स लावले आहेत. मात्र त्याचा कुठलाही फायदा होताना दिसत नाही. पालकमंत्र्यांनी दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करतो असे दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.
जिल्ह्य़ातील १४३ गावांना १८३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील ३८ गावांना ६२ टँकरने, तर चिखली २१ गावे २५ टँकर, मेहकर ४ गावे ४ टँकर, लोणार ४ गावे ५ टँकर, सिंदखेडराजा १४ गावे १४ टँकर, देऊळगांवराजा ८ गावे ८ टँकर, मोताळा २८ गावे ३३ टँकर, खामगाव १० गावे १० टँकर, मलकापूर ६ गावे ११टँकर, नांदुरा ९ गावे ८ टँकर व संग्रामपूर तालुक्यातील १ गावासाठी एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश गावात पाण्याचे कुठलेच स्त्रोत नसल्यामुळे ही गावे पूर्णपणे या टँकरवर अवलंबून आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन ग्रामीण भागात १८ कोटी रुपये खर्च करणार आहे. टँकर सोडले तर यातील ५० ते ६० टक्के खर्च हा निष्फळ जाणार आहे. त्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांचेच चांगभले होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनादेखील ग्रामीण जनतेची तहान भागविण्यास कुचकामी ठरल्या आहेत. एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy water problem in buldhana district
First published on: 11-05-2013 at 03:37 IST