मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील महिन्यात बेकायदेशीर पोस्टरवर थातुरमातुर कारवाई करणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाचे शहरात पुन्हा जोरात वाढलेल्या पोस्टरबाजीकडे दुर्लक्ष झाले आहे. ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र पोस्टर, होर्डिग्ज, यांच्या दर्शनाने शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीयांचा या पोस्टरबाजीत समावेश असल्याने त्या विरोधात आवाज उठविला जात नाही. रविवारच्या जागतिक महिला दिन आणि शिवजयंतीचे पोस्टर आजही कायम असून निवडणूक कामाच्या नावाखाली प्रभाग अधिकारी या बेकायदेशीर होर्डिग्जकडे कानाडोळा करीत आहेत, तर ही पोस्टर हटविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ती न हटविण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यावर आल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी इच्छुक उमेदवार जेवढी पोस्टरबाजी करता येईल तेवढी करीत आहेत. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी पोस्टरबाजी वाढली आहे. जागतिक महिला दिन आणि शिवजंयतीच्या दिवशी ऐरोलीतील रेल्वे स्थानक, रायकर चौक, शिवराज चौक, वाशीतील अरेंजा कॉर्नर, सीबीडी येथील सिडको मुख्यालयाचे परिसर बेकायदेशीर होर्डिग्जने भरून गेले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नवी मुंबईत येऊन गेले त्याला चार दिवस झाले पण त्यांची पोस्टर्स आजही कायम आहेत.
भाजपमधील हवाश्या-गवश्यांनी तर अतिरेक केला आहे. चार पोस्टरची परवानगी घ्यायची आणि ४० लावण्याची कला अवगत असल्याने त्याचा प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे. नाकर्त्यां प्रभाग अधिकाऱ्यांमुळे या मंडळीचे फावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतही हे पोस्टर बॉईज आपली चमकेशगिरी कायम ठेवत आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नवीन आलेल्या आयुक्तांचा पालिका प्रशासकीय कामकाजाचा गाढा अभ्यास सुरू असल्याने त्यांना या बारीकसारीक कामात लक्ष घालण्यास वेळ नाही, अशी टीका होत आहे. पालिका प्रशासनाला निवडणुकीची यादी तयार करणे आणि इतर कामांमुळे पोस्टर्स हटविण्यास वेळ मिळत नसल्याचे कारण पालिका सूत्रांकडून सांगितले जात आहे.

तीन दिवसांत पोस्टर हटविण्यास सांगण्यात आलेले आहेत. गेल्या तीन महिन्यांत प्रशासनाकडून ४५० पोस्टर्सवर करवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोस्टर असतील तेथे तात्काळ कारवाई केली जाईल.
सुभाष गायकर,
उपायुक्त, नवी मुंबई पालिका