महिला व बालविकास विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. सन २००७-०८ वर्षांसाठी नंदा पोळ, २००८-०९ वर्षांसाठी प्रियदर्शनी चोरगे, २००९-१० साठी लक्ष्मी घुगरे व २०१०-११ साठी सिंधुताई चव्हाण यांना पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, डॉ. दीपक म्हैसेकर, आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते. महिला व बालविकास अधिकारी संजय माने यांनी प्रास्ताविक केले. बी.जी.काटकर यांनी सूत्रसंचालन केले.
जि.प.माजी अध्यक्षा नंदा पोळ यांनी निरक्षर दुर्बल गटातील महिलांसाठी बचत गट स्थापन करून सक्षमतेची जाणीव करून देण्याचे काम केले आहे. प्रियदर्शनी चोरगे यांनी निराधार पीडित, शोषित बालके यांना समुपदेशन तसेच महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. लक्ष्मी घुगरे यांनी ११० मुलांसाठी निवासी शाळा, मूकबधिर मुलांसाठी शिक्षक प्रशिक्षण या संदर्भातील काम केले आहे. सिंधुताई चव्हाण यांनी दारूबंदी, गुटखा बंदी, व्यसनमुक्ती, स्वच्छ सुंदर गाव या क्षेत्रात प्रभावी काम केले आहे.