ख्यातनाम संगीतकार एन. दत्ता ऊर्फ दत्ता नाईक यांच्या सांगीतिक कारकीर्दीला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि एन. दत्ता मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे ‘कितना हसीं है जहाँ’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाद्वारे एन. दत्ता यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
एन. दत्ता यांनी संगीत दिलेले ‘धरमपुत्र’, ‘मिलाप’, ‘धूल का फूल’, ‘काला आदमी’, ‘ग्यारह हजार लडकियाँ’, ‘पत्थर का ख्वाब’, ‘चांदी की दीवार’, ‘साधना’, ‘बहार’, ‘सजा’, ‘एक नजर’, ‘जाल’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘जीवनज्योती’ असे ५०-६० च्या दशकांतील अनेक चित्रपट गाजले. गीतकार साहीर लुधियानवी यांची गाणी आणि एन. दत्ता यांच्या चालींनी रसिकांना वेड लावले होते. मराठीमध्येही ‘हे चिंचेचे झाड दिसे मज’, ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’, ‘धुंदीत गाऊ मस्तीत राहू’, ‘सूर तेच छेडिता गीत उमटले नवे’, ‘सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गजले’ यांसारखी ‘अपराध’, ‘मधुचंद्र’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ यांसारख्या चित्रपटांतील एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. एन. दत्ता यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर त्यांची गाजलेली गाणी या विशेष कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमाला आशा भोसले, खय्याम, मीना मंगेशकर, प्यारेलाल, आनंदजी, रवींद्र जैन, सुमन कल्याणपूर, उषा खन्ना, रमेश देव, सीमा देव, राजदत्त, सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. हा कार्यक्रम नंतर टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे.
एन. दत्ता यांनी संगीतकार गुलाम हैदर यांच्यासोबत काम केल्यानंतर एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले. मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मुकेश, सुमन कल्याणपूर, हेमंतकुमार आदी गायक-गायकांनी एन. दत्ता यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अवीट गोडीची गाणी हिंदी चित्रपटांतून गायली आहेत. एन. दत्ता यांचा जीवनप्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, त्यांच्या संगीतरचना याबरोबरच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देणारा हा विशेष कार्यक्रम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homage to musician n datta
First published on: 04-06-2015 at 06:56 IST